चहा विकून सोलापूरचा चहावाला झाला ‘सीए’

somnath
पुणे : सदाशिव पेठेतील पेरूगेटजवळ चहा विकून कुटुंबियांना मदत करणारा आज सीए झाला आहे. सोमनाथ बलराम गिरम (वय २८ करमाळा, सोलापूर) असे या सीएचे नाव आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय मित्रांना आणि चहाच्या टपरीला जाते, अशी प्रतिक्रिया सोमनाथने दिली आहे. त्याला ५५ टक्के गुण मिळाले आहेत.

घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. आई-वडील दोघेही शेतात मजूरी करतात. तरीही सोमनाथने जिद्द सोडली नाही. करमाळा तालुक्यातील जेऊर गावात भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. यासाठी त्याला रोज ३६ किलोमिटर सायकलवर जावे लागायचे. बारावीनंतर सोमनाथ पुण्यात शिकायला आला. पुण्यातील जेधे महाविद्यालय व शाहू महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने जीडीसीएची परिक्षा दिली. शिक्षणाचे खर्च भागविण्यासाठी तो पार्टटाईम जॉब करत होता. नंतर तो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून ए.कॉमची पदवी मिळवली.

सीएच्या परिक्षेची तयारी सुरू केल्यानंतर सोमनाथने सदाशिव पेठेत चहाची टपरी टाकली. पुस्तके, क्लास याचे भागविण्यासाठी तो दिवसभर दुकान चालवायचा आणि रात्री ७ तास अभ्यास करायचा. अखेर सोमनाथला यश आले. मागील १७ जानेवारीला सीएचा निकाल लागला. त्यात त्याला ५५ टक्के गुण मिळाले आहेत. तसेच या पुढे गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे त्याने ठरविले आहे.