लवकरच भारतातही ‘अॅपल’चे स्टोअर्स!

apple
नवी दिल्ली – ‘अॅपल’च्या विविध उत्पादनांच्या अमेरिका आणि चीनमध्ये घटलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता भारतात विस्तारीकरणाची योजना आखण्यास कंपनीने सुरुवात केली असून, त्याच दिशेने एक पाऊल टाकत भारतात किरकोळ विक्रीसाठी दुकाने सुरू करण्यासाठी कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. बुधवारी ही माहिती कंपनीच्या प्रवक्त्यानेच दिली आहे.

कंपनीने हे पाऊल स्मार्टफोनधारकांची भारतातील वाढती संख्या लक्षात घेऊनच उचलल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. एकीकडे आयफोन, आयपॅड, आयपॉड यांची मागणी ‘अॅपल’चे घरचे मैदान असलेल्या अमेरिकेमध्ये कमी होताना दिसते. त्याचवेळी चीनमध्येही कंपनीच्या उत्पादनांची मागणी फारशी वाढली नसल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला.

याबाबत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विभागाकडे ‘अॅपल’ने अर्ज दाखल केला असून, कंपनीकडून सविस्तर माहिती या विभागाने मागवून घेतली आहे. एक ब्रॅंड विक्री क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत केंद्र सरकारने वाढ केल्यानंतरच ‘अॅपल’ने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

Leave a Comment