भारतातील प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचे प्रथमच लंडनमध्ये दर्शन

vrindavani
नवी दिल्ली : १७ व्या शतकात आसाममध्ये हाताने विणली जाणारी मलमल (सिल्क) ब्रिटनमध्ये होणा-या प्रदर्शनात सादर होणार असून वृंदावनी वस्त्र म्हणून हे सिल्कचे कापड त्या काळी ओळखले जात होते. १६८० मध्ये लांपाल तंत्राने तयार केलेल्या सिल्कच्या कापडाचा नऊ मीटरचा तुकडा प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.

२१ जानेवारीपासून लंडनमधील ब्रिटिश म्युझियम येथे कृष्णा इन द गार्डन ऑफ आसाम : द कल्चरल कॉन्स्टेक्ट ऑफ इंडियन टेक्स्टाइल या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन सुरू होणार आहे. त्यात ईशान्य भारतातील प्राचीन सांस्कृतिक इतिहासाचे प्रथमच दर्शन होणार आहे. मध्ययुगात आसाममध्ये कृष्णभक्तीची परंपरा होती. वैष्णव पंथीय संत श्रीमंत शंकरदेव यांनी या साठी चळवळ उभारली होती. आजपर्यंत ती सुरू आहे. श्रीकृष्णाचे चरित्र अनेक लीलांनी भारलेले आहे. त्यामुळेच आसाममध्ये कृष्णभक्तीचा महिमा सांगितला जातो. ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली या बेटावर रास महोत्सवात कृष्णाच्या चरित्रातील अनेक प्रसंगांचे वर्णन केले जाते. कृष्णकथेचा प्रसार गाणे, नाटक, नृत्यातूनच केला जातोच शिवाय वस्त्रोद्योगालाही कृष्णलीलांनी भुलविल्याचे दिसते. त्याचे दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे. माजुली येथील नृत्यात वापरले जाणारे मुखवटे व वृंदावन वस्त्रावर तयार केलेली तीन मिनिटांची चित्रफीतही ब्रिटनमधील प्रदर्शनात दाखविली जाणार आहे.

अनेक शतकांपासून आसाममध्ये सिल्क आणि सुती (कॉटन) कापडनिर्मितीची परंपरा असून लांपास तंत्र खास वृंदावन वस्त्र तयार करण्यासाठी वापरले जात होते. यासाठी लाकडी मागावर दोन प्रकारचे आडवे धागे लावले जात होते. १६ व १८ व्या शतकात भरभराटीला आलेली लांपास तंत्राची परंपरा सध्या भारतातून नामशेष झाली आहे. दहाव्या शतकात पुराणात लिहिलेल्या व शंकरदेवांनी नाटकांमधून सांगितलेल्या कृष्ण चरित्रातील प्रसंग सिल्कच्या कापडावर चितारलेले आहेत. अशा १२ तुकड्यांमध्ये पुराणाची पवित्र प्रत ठेवण्यासाठी वापरण्यात येत होती. या कापडावर कालिया मर्दन, बकासुर युद्ध, गोपींची वस्त्र लपविणे असे प्रसंग दाखविले आहेत. शंकरदेव यांची नाटके आजही रास महोत्सवातून पाहायला मिळतात.

Leave a Comment