या देशात ७ जानेवारीला येतो नाताळ

russia
जगभरातील ख्रिश्चन बांधव त्यांचा पवित्र सण नाताळ २५ डिसेंबर रोजी साजरा करतात मात्र रशियात कांही ठिकाणी हा सण ७ जानेवारीला साजरा केला जातो. विशेषतः रशियातील रूढीवादी (आर्थोडोक्स) चर्च ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे सण उत्सव साजरे करतात व त्या कॅलेंडरनुसार हा सण ७ जानेवारीला येतो. हे कॅलेंडर मानणारे अनेक जण नाताळच्या आधी ४० दिवस उपवास करतात व हे उपवास ६ जानेवारीला संपतात.

मिळालेल्या माहितीनुसार १९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर सरकारने धार्मिक सणांवर बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांनी नवीन वर्षाची सुरवात किवा न्यू ईअर निमित्ताने घरांची सजावट करणे सुरू केले. त्यानिमित्ताने एकमेकांना भेटी देण्याची परंपरा रूळली. मात्र सोव्हीएत युनियनची शकले झाल्यानंतर १९९० च्या दशकांत नाताळ साजरा करण्याला अधिकृत मान्यता दिली गेली. तरीही हा सण लोकप्रिय व्हायला वेळ जावा लागला. आजही अनेक भागात ख्रिसमसपेक्षाही न्यू इअरचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ३१ डिसेंबर ते १० जानेवारी अशी सुट्टी असते. ठिकठिकाणी जत्रा भरतात, मेळे लागतात व लोक सणाचा आनंद लुटतात.

Leave a Comment