मुस्लिमाला किडनी दान करून अमर झाला राम

ram-magar
औरंगाबाद : एका मातेने समाजासमोर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोटच्या मुलाची किडनी दान करून नवा आदर्श ठेवला असून अब्दुल गनी या मुस्लिम व्यक्तीला राम नावाच्या तरूणाच्या मृत्यूनंतर त्याची किडनी प्रत्यारोपण करून त्यांना जीवदान मिळवून दिले. धर्माच्या भिंती ओलांडून दाखविलेल्या या दातृत्वाने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

नोकरीच्या मुलाखतीसाठी बुलढाण्यातील बी.एस्सी. ऍग्री पदवीधर तरूण राम मगर मोटारसायकलवरून अकोल्याला गेला. महामार्गावरील एका गतीरोधकावर त्याची मोटारसायकल तेथून परतत असताना घसरून अपघात घडला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रामचा मृत्यू झाला. त्याची आई मंदाताई मगर यांनी वृद्धापकाळाचा आधार गेल्याने दुःखात बुडालेली असताना मनाच मोठेपणा दाखवित समाजभान ठेवून रामचे यकृत आणि त्याच्या दोन किडन्या दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दरम्यान, औरंगाबाद येथील अब्दुल गनी या व्यक्तीची किडनी निकामी झाल्याने त्यांना किडनीची गरज होती. त्यांना रामची किडनी दान करण्याचा निर्णय मंदाताईंनी घेतल्यानंतर मुंबईतील रूग्णालयात किडनी प्रत्योरापणची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि अब्दुल गनी यांना जीवदान मिळाले.

दरम्यान, गनी कुटुंबियांनी मंदाताईने दाखविलेल्या दातृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या आदर्श मातेचे आजन्म ऋणी असल्याची भावनाही गनी कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली आहे. एका हिंदू तरूणाच्या किडनीने एका मुस्लिम व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. ही घटना जाती-धर्माच्या नावाने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया समाजकंटकांच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारी आहे. त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम ऐक्याची नवी नांदी ठरणारी आहे.

Leave a Comment