जगभरात ५० लाख नोक-यांवर कु-हाड; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल

world-economic
दावोस : येत्या पाच वर्षात चौथी औद्योगिक क्रांती इतर सामाजिक-आर्थिक तसेच लोकसंख्यीय बदलांमुळे जगभरातून ५० लाख नोक-यांचे उच्चाटन होणार असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले असून मात्र भारतात सकारात्मक रोजगारनिर्मिती होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने फ्यूचर ऑफ जॉब्सनावाचा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात अतिरिक्त मनुष्यबळ कमी करणे, यंत्रांचा वाढता वापर यामुळे ७० लाख १० हजार रोजगारांवर कु-हाड कोसळणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक नोक-या व्हाईट कॉलरच्या व प्रशासकीय वर्गातील कमी होणार आहेत.

मात्र २० लाख १० हजार नवीन नोक-या निर्माण होणार आहेत. त्यात संगणक आणि गणित अथवा आर्किटेक्चर व अभियांत्रिकी रोजगारांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण ५० लाख रोजगार नष्ट होणार हे निश्चित झाले आहे. भारतासह एकूण १५ अग्रगण्य प्रगत व उभरत्या अर्थव्यवस्थांचा यासाठी सर्वेक्षण करण्यात आला असून भारतासह पाच-सहा देशांत रोजगाराचे चित्र सकारात्मक असल्याचे त्यात नमूद केले आहे. मात्र त्यातही काही रोजगारांमध्ये मोठे बदल होणार असून काही रोजगार कालबाह्य होऊन नवीन रोजगार उदयाला येणार आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. भारत, मेक्सिको आणि तुर्की या देशांमध्ये रोजगारांचे आशादायक चित्र आहे. आखातातील देशांमध्येही चांगले चित्र असेल. एक रोजगार गमावल्याच्या बदल्यात नवीन रोजगार निर्माण झाल्याचे सर्वोच्च प्रमाण आशियायी देशांमध्ये असून त्यानंतर मेक्सिको, इंग्लंड आणि तुर्कस्तानचा क्रमांक लागतो. अल्पमुदतीसाठी अथवा आभासी कामगारांना घेण्यापेक्षा कौशल्यात गुंतवणूक करणे हे कामगार बाजारपेठेतील उलथापालथीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रमुख गोष्ट आहे, असे बहुसंख्य उद्योगांचे म्हणणे आहे, असेही हा अभ्यास अहवाल म्हणतो.