मार्चपर्यंत टपाल खात्याची एक हजार एटीएम

post
नवी दिल्ली : टपाल खातेही आजच्या आधुनिक युगात मागे राहू इच्छित नाही. अनेक आधुनिक सुविधा टपाल खात्याने उपलब्ध केल्या असून येत्या मार्च महिन्यापर्यंत आता देशभरात १००० एटीएम मशिन्स स्थापित करणार आहे. तसेच २५ हजार विभागीय टपाल कार्यालयांमध्ये कोर बँकिंग सोल्युशन अर्थात सीबीएस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना टपाल विभागाच्या एका अधिका-याने सांगितले की, यापूर्वी देशात टपाल विभागाने १२,४४१ टपाल कार्यालयांत सीबीएस योजना लागू केली आहे आणि ३०० एटीएम उघडलेले आहेत. यावर्षी मार्च पर्यंत देशभरात १००० एटीएम सुरू करण्यात येणार आहेत. टपाल विभागाकडे सध्या २५ हजार टपाल कार्यालय आणि १, लाख ३० हजार ग्रामीण टपाल कार्यालये आहेत. सीबीएसचे ग्राहक सीबीएस नेटवर्कवर कोणत्याही टपाल कार्यालयातून आपल्या खात्यावर व्यवहार करू शकणार आहेत आणि बँकिंग सेवा घेऊ शकतात.

इतर टपाल कार्यालयात जरी ग्राहकांचे खाते असेल तरी देखील कोणत्याही टपाल कार्यालयात खात्यावर व्यवहार करता येणार आहे. ग्रामीण टपाल कार्यालयांसदर्भात संबंधित अधिका-याने सांगितले की, १ लाख ३० हजार टपाल कार्यालयांमध्ये मार्च २०१७ पर्यंत सौर उर्जेवर चालणारे बायोमॅट्रिक उपकरण उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे उपकरण हाताने देखील हाताळता येणार आहे. सुमारे २० हजार ग्रामीण टपाल कार्यालयांना यावर्षी ३१ मार्च पर्यंत ही सौर उर्जेवरील उपकरणे प्रदान केली जाणार आहेत.

Leave a Comment