आग्रह देशीचा

indian
आपल्या देशात सध्या देशीचा फार बभ्रा होत आहे. देशी आणि भारतीय बनावटीचे विशेषत: आपल्या परंपरागत क तंत्रज्ञानावर आधारलेले असे काही निघाले की त्याचा फार जोरदार पुरस्कार केला जातो. मात्र त्याचा प्रभाव समाजातल्या फार कमी लोकांवर होतो. असाच प्रकार अमेरिकेतही सुरू असते. ‘बी अमेरिकन बाय अमेरिकन’. म्हणजेे अमेरिकन व्हा आणि अमेरिकेत तयार होईल तेच विकत घ्या. अर्थात अमेरिकेत अशा मोहिमांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था फार मोठी आहे. ती भारताच्या जवळपास २४ पटींनी मोठी आहे. अर्थव्यवस्था २४ पटींनी मोठी आणि लोकसख्या चौपटीने कमी. म्हणजे अमेरिकेतल्या माणसाचे सरासरी राहणीमान भारतीयांच्या सरासरी राहणीमानापेक्षा ९६ पटींनी जास्त आहे. त्यांनी आपल्या गरजेची एखादी वस्तू परदेशातून आयात केली तर त्यांचे फार काही नुकसान होत नाही. त्यांच्या देशात मनुष्यबळ फार महाग आहे त्यामुळे प्रामुख्याने मनुष्यबळ गुंतलेली उत्पादने तिथे महाग होतात आणि ती आपल्या देशात तयार करण्याऐवजी भारतासारख्या मनुष्यबळ तुलनेने स्वस्त असलेल्या देशातून आयात करणे त्यांना परवडते.

आपल्याही देशात काही लोक स्वदेशीचा फार नारा लावत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याला एक वेगळे महत्त्व होते पण आता आपण केवळ देशात आणि देशी कंपन्यांनी तयार केलेल्याच वस्तू वापरायच्या असे ठरवले तर ते अव्यवहार्य ठरणार आहे. कारण आपण केवळ देशीच वस्तू वापरायला लागलो तर आपल्याला लागणार्‍या सगळ्याच वस्तू काही भारतात तयार होत नाहीत. त्या आपल्याला आयात कराव्याच लागतील. आताच्या जमान्यात आपण आपल्या देशाची दारे परदेशातल्या वस्तूंसाठी बंद करू शकत नाहीत. कारण त्याचा परिणाम होऊन आपलीही उत्पादने बाहेर जाणार नाहीत. म्हणून आजच्या या काळात स्वदेशीचा नारा काही व्यवहार्य नाही. मात्र तरीही आपल्याला काही बाबतीत देशीचा आग्रह धरावाच लागेल. कारण त्यात आपले हित आहे. सध्या काही सोशल मीडियाच्या साईटस्वर एक माहिती फिरवली जात आहे. या माहितीत दिलेले काही खाद्य पदार्थांचे तपशील फार धक्कादायक आहेत. आपण आपल्या मुला बाळांना काही खाद्यपदार्थ फार आवडीने आणि हौसेने खायला घालतो पण त्या सार्‍या खाद्य पदार्थांत काही घातक रसायने आणि विषारी घटक आहेत असे या माहितीत म्हटले आहे. ंमॅगीच्या बाबतीत असेच काही दिसून आल्यामुळे काही दिवस ती बंद होती. पण नंतर तिने न्यायालयात आपले म्हणणे सादर केले आणि तिच्यात काही घातक नसल्याचे दाखवून दिले.

आता मॅगी पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात आली आहे.
आता या पाठोपाठ बर्गर, पिझ्झा, काही थंड पेये, चॉकलेट अशा काहींबाबत नवी माहिती समोर आली आहे. या माहितीचा प्रकार मॅगीसारखा नाही. मॅगीवर केवळ आरोप आला होता. पण आता समोर आलेल्या माहितीतल्या पदार्थांची बाब तशी नाही. या पदार्थांवर जी माहिती आली आहे त्या पदाथार्र्ंपैकी काहींत घातक रसायने आहेत. काहींत गायीच्या चरबीचा वापर केलेला आहे. तर काही पदार्थांत डुकराच्या चरबीचा वापर केलेला आहे. हे केवळ आरोप नाहीत तर त्यांच्या उत्पादकांनी या गोष्टी मान्य केल्या आहेत. या घातक गोष्टी त्या पदार्थांत निरनिराळ्या रासायनिक नावांनी घातलेल्या आहेत. दुसरा प्रकार म्हणजे त्या रसायनांची निर्मिती करताना या चरब्या वापरल्या गेल्या आहेत. त्यांची रासायनिक नावे वेगळी आहेत आणि ती त्या उत्पादनावर बिनदिक्कतपणे लिहिलेली आहेत. कारण त्या रसायनांच्या नावावरून आपल्याला काहीच बोध होत नाही आणि कोणाचीही हरकत, आक्षेप येण्याची भीती नाही. वापराचा मार्ग काहीही असो पण त्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्याला प्राण्यांची चरबी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे खिलवली जात आहे.

आता प्रश्‍न आपला आहे. फार स्वदेशीचा आग्रह धरता येत नाही, तसा तो धरणे हे मागासलेपणाचे लक्षण आहेअसे आपण कितीही म्हटले तरी आपल्या मनाला या चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे अवघड आहे. त्याला आपण देशी पर्याय दिला पाहिजे. आपण कोणत्याही हॉटेलात जाऊन बिनदिक्कतपणे परदेशी कंपनीचे थंडपेय मागवतो. पण त्याऐवजी आपण लिंबू शरबताचा आग्रह धरला पाहिजे. या थंड पेयांना फळांचे रस आणि उसाचा रस हा चांगला पर्याय आहे. हे रस आपल्या आरोग्यालाही चांगली असतात आणि आपण ती घ्यायला लागलो तर उसाला आणि फळांना असलेली मागणी वाढण्याची शक्यता असते. त्यातून आपल्या देशातल्या शेतकर्‍यांच्या हातात चार पैसे जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण स्वदेशी होणे हे शक्यही आहे, सोपेही आहे आणि व्यवहार्य असून फायदेशीरही आहे. आपल्याला कोणी मागासलेले म्हटले तरी चालेल पण आपण आपल्या देशातली अनमोल संपत्ती या परदेशी खाद्यांवर खर्च करण्यास आळा घातलाच पाहिजे. आपल्या देशात एका बाजूला कुपोषित बालके आहेत आणि दुसर्‍या बाजूला अतिपोषित बालके आहेत. या अतिपोषित बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांना पिझ्झा, बर्गर आणि शीत पेये यांचा खुराक देण्याच्या ऐवजी देशी फळांचा वरवा लावला तर त्यांचे अनावर वजन कमी होईल आणि कुपोषित बालकांच्या पोटात अन्नाचे चार घास जाऊन त्यांनाही दिलासा मिळेल.

Leave a Comment