वॉलमार्ट २६९ स्टोअर्स बंद करणार

wallmary
वॉशिंग्टन – २६९ स्टोअर्स बंद करून 16 हजार कर्मचा-यांची कपात करण्याचा निर्णय किरकोळ बाजारपेठेतील ‘वॉलमार्ट स्टोअर्स इन्कॉर्पोरेशन’ या मोठय़ा कंपनीने जाहीर केला असून यातील ६००० कर्मचारी अमेरिकेबाहेरील असल्याचे कळते. अमेरिकेतील १५४ स्टोअर्स व बाहेरील ११५ स्टोअर्स बंद करण्याचा निर्णय अर्कान्सासमधील बेन्टोनाव्हिले स्थित या कंपनीने घेतल्याचे सांगितले.

या किरकोळ बाजारपेठेतील सर्वात मोठय़ा कंपनीने ब्राझीलमधील ६० स्टोअर्स बंद केले आहेत. त्यांना आर्थिक तोटा झाला असून ब्राझीलमध्ये केवळ ५ टक्के विक्री झाली असल्याची कंपनीने माहिती दिली. इतर विक्री केंद्रात कपात केलेल्या बहुतेक कामगारांना इतर ठिकाणी सामावून घेतल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. अमेरिकेत बहुतेक लहान असलेले स्टोअर्स तसेच लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठेत असलेले ५५ स्टोअर्स बंद करण्यात येत आहेत. हे स्टोअर्स प्रायोगिक तत्त्वांवर २०११ मध्ये चालू करण्यात आले होते.

जगातील उपनगरीय भागात गोदामाच्या स्वरुपात 405 स्टोअर्स उघडण्याचे ठरले. ते पुढील आर्थिक वर्षात चालू करण्याचे उद्दिष्ट आहे, असे शुक्रवारच्या प्रसारणात वॉलमार्टने म्हटले आहे. स्टोअर्स बंद करण्याचा निर्णय घेणे सोपे काम नव्हते. पण कंपनीची स्थिती भविष्यकाळात मजबूत राहण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला, असे वक्तव्य वॉलमार्ट स्टोअर्सचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) दाग मॅकमिकलन यांनी सांगितले.

Leave a Comment