लोण्यापासून बनतेय देवीची प्रतिमा

rajeshwari
कांगडा- हिमाचल प्रदेशातील कांगडा भागातील प्रसिद्ध ब्रजेश्वरी मंदिरात १५०० किलो लोण्यापासून देवीची प्रतिमा बनविली गेली आहे. येथील प्रमुख पवन बंद्याल यांनी दिलेल्या माहितीपासून मकर संक्रांतीपासून हे काम सुरू झाले असून ही प्रथा दरवर्षी पाळली जाते. लोण्यापासून प्रतिमा बनविण्यापूर्वी ते लोणी १०८ वेळा पवित्र तीर्थाने धूवून घेतले जाते. आठवडाभर हा उत्सव चालतो.

यंदा २० जानेवारीपर्यंत हा उत्सव असून या दिवशी प्रतिमेसाठी वापरलेले लोणी भाविकांना प्रसाद म्हणून वाटले जाणार आहे. लोण्याचा हा प्रसाद सांधेदुखी, जुनाट त्वचा विकार बरा करणारा असतो अशी भाविकांमध्ये भावना आहे. पौराणिक कथेनुसार युद्ध सुरू असताना भगवान जेव्हा जखमी झाले तेव्हा त्यांच्यावर देवतांनी मकर संक्रांतीला उपचार केले ते लोणी लावून केले. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे.

हे मंदिर प्रसिद्ध असून येथे दररोज येणार्‍या भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यात प्रामुख्याने पंजाब, उत्तराखंड, हरियाना, दिल्ली व उत्तरप्रदेशातील भाविक अधिक संख्येने असतात.

Leave a Comment