नेपाळ भूकंपानंतर हिमालयातील शिखरांच्या उंचीत फरक

himalaya
काठमांडू : नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या भूकंपानंतर आशियात १५०० मैल परिसरात विस्तारलेल्या हिमालयाच्या काही पर्वत शिखरांची उंची कमी तर काहींची जास्त झाल्याचा परिणाम दिसून आला आहे. हिमालयामध्ये भूकंपामुळे गेल्या ५ कोटी वर्षांत म्हणजे भूगर्भशास्त्रानुसार पापणी लवण्याइतक्या काळात पर्वत शिखरांच्या उंचीत बदल झाले आहेत. संशोधकांनी प्रादेशिक प्रस्तरभंग रेषा शोधली असून ती नेपाळमध्ये भूपृष्ठाखाली खोलवर आहे. ज्या ठिकाणी दाब जास्त असतो तेथे पुन्हा प्रस्तरभंग होऊन भूकंपाचा धोका असतो. ही रेषा अजून पूर्णपणे दुभंगली नसल्याने येत्या काही दशकांत नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाची व ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता आहे.

हिमालयाच्या काही शिखरांची उंची नेपाळच्या भूकंपानंतर ६० सें. मी. इतक्या अंतराने कमी झाली आहे. तरी माऊंट एव्हरेस्टच्या बाबतीत फार परिणाम झालेला नाही. माऊंट एव्हरेस्ट हा जगातील उंच पर्वत मानला जातो. वैज्ञानिकांनी प्रगत उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व नेपाळमध्ये भूकंपानंतरच्या बदलांचे मापन केले असता हिमालयातील काही शिखरांची उंची नेपाळ भूकंपाच्या पहिल्या काही सेकंदांतच खाली आल्याचे दिसून आले.

माऊंट एव्हरेस्ट भूकंपाच्या क्षेत्रात पूर्वेकडे ५० कि. मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्याने त्याच्यावर काही परिणाम झाल्याची शक्यता कमी आहे. वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये ८ हजार बळी घेणा-या भूकंपाचा पर्वत शिखरांच्या उंचीवर झालेला परिणाम अभ्यासला आहे. ब्रिटनचे सेंटर फॉर द ऑब्झर्वेशन अँड मॉडेलिंग ऑप अर्थक्वेक्स, व्होल्कॅनोज व टेक्टॉनिक्स या संस्थेच्या वैज्ञानिकांनी हा अभ्यास केला असून त्यांच्या मते भूकंप होण्याच्या आधी व नंतर गिरिशिखरांच्या उंचीत फरक होत जातो. त्यात हिमालयाचा समावेश आहे. यात २० कि. मी. खोलीवर जेव्हा हालचाली होतात तेव्हा पर्वतशिखरांची उंची भूकंप नसताना वाढते. नेपाळमध्ये अनेक उंच पर्वत आहेत.

Leave a Comment