‘गुगल इंडीया’ने बाळासाहेबांवर ‘डूडल’ बनवावे

google
मुंबई – २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ८९वी जयंती साजरी होत असून या जयंती निमित्त गुगल इंडियाला बाळासाहेबांवर डूडल बनविण्यासंबंधीचे निवेदन दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहूल शेवाळे यांनी सादर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी शिवसेनेने एक आगळीवेगळी मागणी केली आहे.

गुगल आपल्या लोगोची सण, उत्सव, जयंती आदी अनेक गोष्टींचे निमित्त साधत कलात्मक पद्धतीने रचना करते. त्यांच्या या कलात्मक पद्धतीला डूडल असे म्हणतात. गुगलचे हे कलात्मक पाऊल जगप्रसिद्ध आहे. ज्या विषयावर आधारित डूडल बनविले जाते त्याबद्दल माहितीही प्रसारित केली जाते, ज्यामुळे केवळ एका क्लिकवर लाखो नेटक-यांना त्याची माहिती मिळते. हीच बाब ध्यानात घेऊन बाळासाहेबांची महती देशभर पोहचावी यासाठी राहूल शेवाळे यांनी गुगल इंडियाला निवेदन केले आहे. यासंबंधी शेवाळे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनाही निवेदन दिले असून त्यांनाही याबाबतीत दखल घेण्यास सांगितले आहे.

बाळासाहेबांची देशाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान राहिल्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाची महती त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी त्यांचे गुगल डूडल बनवावे, असे निवेदन शेवाळे यांनी गुगल इंडियाला केल्यामुळे येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील डूडल गुगलच्या होमपेजवर पहायला मिळणार का, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.

Leave a Comment