नवे गूगल मॅप सुचविणार आपले गंतव्य स्थान

Google-Map-Driving-mode
वॉशिंग्टन: यापूर्वी आपण घेतलेला ठिकाणांचा शोध आणि सध्याचे ठिकाण यावरून आपण आता नेमके कुठे जाणार आहोत; याचा अंदाज बांधून त्या मार्गावरील वाहतुकीबाबत उपयुक्त माहिती देणारी नवी सुविधा ‘गुगल मॅप’च्या ९.१९ या नव्या व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या नव्या व्हर्जनमध्ये ‘ड्रायव्हिंग मोड’ ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सुविधा कार्यान्वित केल्यानंतर आपल्या या पूर्वीच्या ठिकाणांच्या इतिहासावरून आपण कोठे काऊ इच्छितो; याचा अंदाज हे अॅप घेईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर वाहतुकीची परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास नेमका किती वेळ लागू शकतो; याची माहिती या अॅपद्वारे मिळू शकेल.

या सुविधेचे ‘गूगल नाऊ’ या सुविधेशी बरेच साधर्म्य आहे. मात्र ‘ड्रायव्हिंग मोड’ ही सुविधा आपल्याला स्वत:हून कार्यान्वित करावी लागते आणि या सुविधेद्वारे मिळणारी माहिती ही आपल्या या पूर्वीच्या प्रवासाच्या सवयी आणि इतिहास यावर आधारलेली असते.

अँड्रॉईडवर उपलब्ध असलेली ही सुविधा ‘आय फोन’वर उपलब्ध होऊ शकेल किंवा नाही; याचा खुलासा गूगलने अद्याप केलेला नाही.

Leave a Comment