‘इन्फोसिस’च्या संचालकपदी मंत्र्यांची पत्नी : ट्विटरवर वाद

Punita-Sinha
बंगळुरू: देशातील दुसऱ्या क्रमांकाची ‘आऊटसोर्सिंग’ कंपनी असलेल्या ‘इन्फोसिस’ या कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पत्नी आणि नामांकीत गुंतवणूक तज्ज्ञ पुनीता सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे ट्विटरवर वादाला तोंड फुटले आहे.

पुनीता यांना निधी व्यवस्थापन क्षेत्रातील २५ वर्षाचा अनुभव असून विशेषत: आंतरराष्ट्रीय आणि नव्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठेतील गुंतवणुकीबाबत त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आहे. अमेरिकेतील अनेक नामवंत कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र त्यांच्या ‘इन्फोसिस’मधील नियुक्तीमुळे समाजमाध्यमांवर वाद रंगू लागले आहेत.

‘देशाच्या अर्थ राज्यमंत्र्यांची पत्नी संचालक पदावर असल्यावर ‘इन्फोसिस’चा ताळेबंद कोण तपासणार; असा उपरोधिक सवाल काही जण करीत असून ‘इन्फोसिस’च्या या निर्णयावर टीका केली जात आहे. मात्र या वादाला राजकीय रंग आला असून त्याला प्रत्यत्तर देण्यासाठी काही जण पी चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांच्या पत्नी नलिनी यांनी आयकर विभागाच्या वकील म्हणून न्यायालयात उभ्या राहिल्या; याची आठवण करून दिली आहे.

पुनीता सिन्हा यांची केवळ अर्थ राज्यमंत्र्यांची पत्नी एवढीच ओळख नाही. एक नामांकित गुंतवणूकतज्ज्ञ म्हणून कॉर्पोरेट जगतात त्यांची स्वतंत्र ओळख आहे; असे अनेक जणांनी नमूद केले आहे. अर्थव्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट प्राप्त केलेल्या पुनीता सिन्हा या ‘पॅसिफिक पॅरॅडीम’ या गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या संस्थापक भागीदार आहेत. त्यांनी ‘ब्लॅकस्टोन ग्रुप’ या ३०० दशलक्ष डॉलर्सचे भांडवल असलेल्या कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे.

Leave a Comment