कोट्यावधी पतंग तयार करणारे युसुफचाचा

yusuf
सुरत- मकरसंक्रांत आली की प्रामुख्याने गुजराथला वेध लागतात ते पतंगमहोत्सवाचे. संक्रंाती दिवशी सारे आकाश या चित्रविचित्र पतंगांनी व्यापून राहते आणि लोकही मोठ्या संख्येने पंतग उडविण्याचा आणि पतंग उडताना पाहण्याचा आनंद लुटतात. हे पतंग बनविणे सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात हे काम इतके सोपे नाही. पतंग चांगला उडला तरच तो चांगला बनविला असे समजले जाते. सुरत येथील युसुफचाचा शाह यांनी आजपर्यंतच्या त्यांच्या ८० वर्षांच्या आयुष्यात कोट्यावधी पतंग बनविले आहेत. युसुफचाचांचे पतंग गुजराथेत इतके प्रसिद्ध आहेत की जाणकार लोक नुसता पाहूनही हा पतंग युसुफचाचांचा असे ओळखतात.

युसुफचाचांनी आजवर कोट्यावधी पतंग बनविले खरे पण त्यांनी आयुष्यात एकदाही पतंग उडविलेला नाही. ते सांगतात खरे सांगायचे तर मला पतंग उडवता येत नाही. संक्रांतीदिवशी घराच्या गच्चीवर दिवसभर बसून ते पतंग उडताना पाहण्याचा आनंद मात्र लुटतात. गेल्या तीन पिढ्या त्यांच्या घरात पतंग बनविण्याचा उद्योग केला जातो आणि वर्षभर हे काम सुरू असते. उत्तरायण पर्वाची सुरवात झाली की युसुफचाचांकडे एकापेक्षा एक मस्त डिझाईनच्या पतंगांच्या ऑर्डरीचा ओघ सुरू होतो व घरातील सर्व मंडळी या कामात बुडतात. बडोदा, अहमदाबाद येथूनही त्यांच्या पतंगांना मोठी मागणी असते. सणाच्या अगोदर महिनाभर लाखो पतंगांच्या ऑर्डर्स त्यांना येतात.

युसुफचाचा पत्नीच्या सहकार्याने दिवसाला ५०० पतंग तयार करतात. ते सांगतात पूर्वी पतंग स्वस्त विकायला परवडत होते पण आता कच्चा माल महाग झाला आहे आणि महागाईही वाढल्याने छोटे पतंगही ३० ते ५० रूपयांच्या दरम्यान विकले जातात.

Leave a Comment