भारतात क्रुडऑइल मिनरल वॉटरपेक्षा स्वस्त

Petol-Pump
ग्राहक मात्र या स्वस्ताईपासून वंचित

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सातत्याने ढासळत असल्याने भारतात क्रुडऑइल मिनरल वॉटरपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होत आहे. मात्र केंद्र सरकार सातत्याने अबकारी कर (एक्साईज ड्युटी) वाढवीत असल्याने या स्वस्ताईचा फायदा ग्राहकांना मिळत नाही.

जागतिक स्तरावर पेट्रोलियमच्या किंमतीमध्ये विक्रमी घट होत आहे. त्याच वेळी तुलनेने डॉलर आणि रुपयाच्या किंमतीमधील संतुलन कायम आहे. त्यामुळे भारतात क्रुडऑइलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर उतरल्या आहेत. सध्या देशात १५९ लिटर क्रुडऑइलच्या एका बॅरलची किंमत २९.२४ डॉलर्स; अर्थात १ हजार ९५६ रुपये ४५ पैसे एवढी आहे. अर्थात एक लिटर क्रुडऑइल १२ रुपयांना; म्हणजे १५ रुपयांना मिळणाऱ्या मिनरल वॉटरपेक्षा २० टक्के स्वस्त दरात उपलब्ध आहे.

मात्र पेट्रोलियम कंपन्यांचा; पर्यायाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी सरकार सातत्याने कर वाढवीत आहे. याच महिन्यात या आर्थिक वर्षातील पेट्रोलियम उत्पादनांवर अबकारी कराची चौथी वाढ केली आहे. सध्या पेट्रोलवर प्रति लिटर ७ रुपये ७३ पैसे; तर डिझेलवर ७ रुपये ८३ पैसे एवढा अबकारी कर आकाराला जातो. याशिवाय राज्यांचे आणखी वेगळे कर आहेतच.

सरकारने ही करवाढ केली नसती तर ग्राहकांना १० रुपये २ पैसे दराने पेट्रोल; तर ९ रुपये ९७ पैसे दराने डीझेल उपलब्ध होऊ शकले असते.

Leave a Comment