येथे पुलांवरून जातात जहाजे आणि बोटी

meaburg
नद्यांवर पूल बांधणे यात नवीन कांहीच नाही. मग बरेचदा हे पूल विशेष प्रकारे आकर्षक करून बांधले जातात. मात्र जगात असेही पूल आहेत जेथे पुलांवरून मोटारी, ट्रक, रेल्वेची वाहतूक न होता बोटी, नावा व जहाजांचीच वाहतूक होते. त्यांना वॉटर वेज अथवा अॅक्युडक्ट असे म्हटले जाते.

यातला एक पूल आहे तो जर्मनीतील मेगाबर्ग वॉटर ब्रिज. जगातला अशा प्रकारच्या पुलातला हा सर्वाधिक लांबीचा पूल आहे. अल्बे नदीवरचा हा पूल अल्बे नदीतून निघणार्‍या अल्बे हॅवल कालव्याला मीटलँड कालव्याशी जोडतो. या वॉटरवे मधून मोठमोठी जहाजेही जातात. पूर्वी हे दोन्ही कालवे अल्बे नदीच्या उलट दिशेने मिळत होते व त्यामुळे जहाजांना १२ किमीचा वळसा घालावा लागत असे. जर्मनीचे एकीकरण झाल्यानंतर या पुलाचे काम १९९७ मध्ये सुरू झाले व तो २००३ मध्ये पूर्ण झाला. ९१८ मीटर लांबीचा हा पूल बांधण्यासाठी ५० कोटी युरो खर्च आला आहे.
posisilte

ब्रिटनमधील अशाच प्रकारचा पोसीसिल्टे वॉटर ब्रिज रेक्सहॅक कौंटीमध्ये आहे. औद्योगिक क्रांतीच्या काळात हा पूल बांधला गेला व आज २०० वर्षे उलटल्यावरही तो उत्तम प्रकारे वापरात आहे. डी नदीच्या खोर्यात हा पूल एल्ममेश कालवा हेनबिक्सजवळ कोळखा खाणींना जोडतो. त्या काळातला इंजिनिअरिंगचा हा उत्कृष्ठ नमुना समजला जातो. आज २०० वर्षांनंतरही हा ब्रिटनमधील सर्वात उंचीवरचा व लांबीचा वॉटर वे आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश केला गेला आहे. १७९५ मध्ये या ३०७ मीटर लांबीच्या पुलाच्या कामाची सुरवात झाली व तो १९०५ मध्ये बांधून पूर्ण झाला. आज तो कोळसा वाहतूकीसाठी वापरला जात नाही मात्र पर्यटकांचे हे आवडीचे वॉटर स्पॉट आहे.
swing

बेंटॉर्म स्विंग वॉटर वे हा ब्रिटनमधलाच आणखी एक पूल. हाही इंजिनिअरींगचा अजोड नमुना मानला जातो. मॅन्चेस्टर शिप कॅनलवर बनलेला हा पूल ब्रिजवॉटर कालव्याच्या दोन्ही टोकांना जोडतो. हा पूल मुव्हेबल आहे हे विशेष. त्याचे डिझाईन सर अॅंड्रू लीडर विलीयम्स यांनी तयार केले होते.१८९४ मध्ये त्याचा वापर सुरू झाला व तो आजही वापरात आहे. या कालव्यातून जहाजे जात असताना स्विंग वॉटर ब्रिजची दोन्ही टोके ९० अंशात फिरवून दुसर्‍या दिशेला वळविली जातात. ही टोके फिरवली गेली की त्यात सुमारे ८०० टन इतके पाणी भरते व मोठी जहाजे जाऊ शकतात.

Leave a Comment