आता ‘ही’ जीन्स वापरा वर्षानुवर्ष न धुता

Odo-Denim
वॉशिंग्टन: काही जण मळखाऊ म्हणून मळकट जीन्स वापरतात; तर काही जण धुण्यासाठी अवघड म्हणून जीन्स वापरणे टाळतात. मात्र या दोघांनाही आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. वर्षानुवर्ष धुण्याची आवश्यकता नसलेली जीन्स अमेरिकेतील संशोधकांनी विकसित केली आहे. याच्या धाग्यांमध्ये वापरलेल्या चांदीमुळे ही जीन्स मळतही नाही आणि त्यात जंतूही रहात नाहीत.

मूळचे पाकिस्तानचे आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले संशोधक सलमान चौधरी यांनी धुण्याची गरज नसलेली ‘ओडो डेनिम’ ही जीन्स विकसित केली आहे. अंतराळवीर अवकाशात जाताना जो वेश परिधान करतात; त्याला धुण्याची गरज नसते. कारण त्यामध्ये चांदीचा वापर केलेला असतो. चांदी ही कपड्याला निर्जंतुक करते. त्यामुळे कपड्याला दुर्गंधी येत नाही आणि त्यांच्यावर मळही रहात नाही.

या कपड्यांपासून प्रेरणा घेऊन चौधरी यांनी ‘ओडो’ विकसित केली आहे. मात्र या जीन्सला चांदीचे आवरण दिले जात नाही; तर जीन्सच्या धाग्यातच चांदीच्या बारीक तारांचा वापर केला जातो. त्यामुळे ते चमकत नाहीत आणि दिसायला सामान्य जीन्सप्रमाणेच दिसतात. मात्र त्या चांदीमुळे निर्जंतुक होतात आणि मळत नाहीत. त्यामुळे त्यांना धुण्याची आवश्यकता रहात नाही. अगदी वर्षानुवर्ष!

सुमारे दोनशे वर्षापासून माणूस पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी चांदीचा वापर करीत आहे. यापासूंच आपल्याला या संशोधनासाठी प्रेरणा मिळाली आणि अंतराळवीरांच्या कपड्यांच्या बनावटीमुळे त्याला बळकटी मिळाली; असे चौधरी यांनी सांगितले.

या जीन्ससाठी ‘ओडो’च्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू झाली असून त्याची किंमत सध्या ९५ डॉलर्स; अर्थात ६ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. प्रत्येक जीन्समध्ये सुमारे १० ते १५ ग्राम चांदी वापरण्यात आली आहे. आता नोंदणी केल्यानंतर जीन्स मिळण्यासाठी दीड वर्ष वाट पहावी लागणार असली तरीही त्यावर जीन्सच्या चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. कंपनीने या नोंदणीतून १० हजार डॉलर्स उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात नोंदणीची मुदत संपण्यास एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असतानाच या उद्दिष्टाच्या तब्बल नऊपट रक्कम नोंदणीद्वारे जमा झाली आहे.

Leave a Comment