एकुलता प्रवासी असलेली ही ट्रेन मार्चमध्ये घेणार निरोप

railway
भारतात खेडोपाड्यातील तसेच वाड्यावस्त्यांवरच्या मुलांना शाळेत जायचे असेल तर जंगले, डोंगर, नद्या पार करून जावे लागत असल्याची शेकडो उदाहरणे आहेत. पायी दूर अंतर चालत जाणे हे तर नेहमीची बाब. जपान मात्र या संदर्भात वेगळाच देश म्हटला पाहिजे. कारण येथील एक रेल्वे स्टेशन केवळ एका मुलीसाठी सुरू ठेवले गेले आहे. ही मुलगी दररोज रेल्वेने शाळेत जाते व तिच्यासाठी ही गाडी चालविली जाते. विशेष म्हणजे ही मुलगी कोणा अमीर उमरावाची मुलगी नाही तर ती सर्वसामान्य नागरिकाचीच कन्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जपानच्या उत्तर होक्काईडो प्रांतातील कामी शिराताकी स्टेशन कांही वर्षांपूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारण या भागातून प्रवासीच नाहीत आणि येथे लोकसंख्याही अतिशय विरळ आहे. मात्र येथून दररोज एक मुलगी या ट्रेनने शाळेत येजा करते आहे असे समजल्यावर व तिला शाळा गाठण्यासाठी अन्य मार्ग नाही हे कळल्यावर सरकारने ही ट्रेन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेची वेळही तिच्या शाळेच्या वेळेनुसार केली गेली. ही मुलगी रोज एकटीच या ट्रेनने शाळेत जाते व परत येते. शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी ट्रेनलाही सुट्टी दिली जाते. सरकारने या मुलीची पदवी परिक्षा होईपर्यंत ही रेल्वे सुरू ठेवण्याचे ठरविले होते व या मार्चमध्ये ही मुलगी पदवी परिक्षा देईल. त्यानंतर ही ट्रेन पूर्णपणे बंद केली जाईल असे रेल्वेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे

Leave a Comment