भारतीय वैज्ञानिकाचे आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान

albert
शिमला- भारतीय वैज्ञानिकाने अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान दिले असून, अजय शर्मा यांनी E = mc² हे सूत्र अपूर्ण असल्याचे मत मांडले आहे. हे सूत्र परिपूर्ण नसून फक्त काहीच परिस्थितीमध्ये ते बरोबर ठरते असे शर्मा यांनी म्हटले.

केवळ विरुद्ध दिशेला एकाच गतीने एक समान ऊर्जा असलेले दोन प्रकाश तरंगांचा अभ्यास करुन आइन्स्टाइन यांनी हे सूत्र दिले होते. हे सूत्र आइन्स्टाइन यांनी १९०५ मध्ये तयार केले होते. विशिष्ट परिस्थितीमध्येच हे सूत्र बरोबर ठरते असे शर्मा यांनी म्हटले. प्रकाश तरंगांची संख्या, प्रकाश ऊर्जेचा आवाका, सापेक्ष गती, आणि तरंगांचा कोन या सर्व बाबींची पूर्तता झाल्यावरच हे सूत्र बरोबर ठरते असे शर्मा म्हणाले.

E = mc² हे सूत्र L= mc² या सुत्रापासून आइन्स्टाइन यांनी घेतले होते. आइन्स्टाइन यांनी L च्या जागी E ठेवले आणि हे सूत्र तयार केले असे त्यांनी म्हटले. अजय शर्मा यांनी “बियॉन्ड आइन्स्टाइन अॅंड E = mc²” हे पुस्तक लिहिले आहे. केंब्रिज इंटरनॅशनल सायन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. आइन्स्टाइन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत जगाला दिला नाही असे त्यांनी म्हटले आहे. १९०५ मध्ये अॅनालेन डी फिजीक या जर्नलमध्ये सापेक्षतावादाबदद्ल बरेच लिखाण दिसून येते. त्यातून आइन्स्टाइन यांनी ही संकल्पना उचलली असे शर्मा त्यांच्या पुस्तकात म्हणतात. त्यांच्यामते गॅलिलियो, पॉइनकेअर, लोरेंज, लार्मर या वैज्ञानिकांचे अप्रकाशित साहित्य त्यांनी त्यांच्या नावावर खपवले असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. शर्मा हे हिमाचल प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक आहेत.

Leave a Comment