२५०० वायफाय हॉटस्पॉटची पुढील वर्षात स्थापना

ravi-shankar
मुंबई : केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिजिटल भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी कनेक्टिव्हिटीला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे लागेल, असे आपल्या मंत्रालयांतर्गत येणा-या विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ब्रॉडबँडचा देशभरात प्रसार, वायफाय आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्क अशा कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. तसेच पुढच्या वित्तीय वर्षात २५०० वायफाय हॉटस्पॉट स्थापन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

डिजिटल भारत मोहिमेचा उद्देश गरीब आणि वंचितांना सक्षम करणे हा औष्ण आपल्या मोबाइल फोनच्या माध्यमातून किरकोळ चहा-विक्रेता, पानवाला, सुतार, अशा लोकांनी सेवांचा लाभ घ्यावा, असे धोरण आहे. डिजिटल भारताची हीच खरी संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. १०० कोटी नागरिकांकडे मोबाइल फोन तर ४० कोटी नागरिकांकडे इंटरनेट असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. भारताला खरोखर एक सक्षम समाज बनविण्यासाठी आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि ई-कॉमर्स या क्षेत्रातील प्रगतीसाठी आम्ही डिजिटल भारताला मजबूत करू, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणांसाठीच्या आराखड्याची घोषणा करताना प्रसाद म्हणाले की, नेक्स्ट जनरेशन नेटवर्कअंतर्गत २०१६-२०१७ या वित्तीय वर्षात ४ लाख जोडण्या महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण आणि नांदेड तसेच महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचा भाग असणा-या गोव्यात सेवा उपलब्ध असेल. सर्वसमावेशक वाढीचा प्रसार गरजेचा असल्याचे अधोरेखित करीत देशभरात लहान गाव-शहरांमध्ये कॉल सेंटरच्या स्वरूपात ४८००० आसन क्षमतेचे बीपीओ स्थापन करण्याची सरकारची योजना असल्याचे प्रसाद यांनी घोषित केले. यापैकी महाराष्ट्रात ३५०० आसन क्षमतेची ३५ कॉल सेंटर असतील. लहान ठिकाणे आणि छोट्या शहरांमधील बीपीओ कॉल सेंटर डिजिटल भारतासाठी महत्वाची ठरतील, असे त्यांनी सांगितले. सरकारने भारतीय टपाल विभागाला ई-कॉमर्स क्षेत्रात सक्रिय होण्यास सांगितले आहे.

Leave a Comment