विद्यार्थ्यांच्या गृहपाठसाठी रोबोमेट प्लसचे नवीन ऍप

robomete
मुंबई – देशाला डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले असून पंतप्रधानांच्या या स्वप्नानेच प्रेरित होत महाराष्ट्रात शाळांच्या संगणकीकरणास सुरुवात झाली असून आता विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धतदेखील डिजिटल होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आता ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट प्लस’ या मोबाईल ऍपमुळे (संगणकीय प्रणाली) आणखी सोपे झाले आहे. या मोबाईल ऍपमुळे विद्यार्थ्यांना आता कधीही आणि केव्हाही अभ्यास करता येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले.

ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट प्लस’ या मोबाईल ऍपचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्र्याच्या दालनात करण्यात आले. यावेळी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्रेणीक कोटेचा उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी रोबोमेट हे ऍप मोफत डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी हा उत्तम ई मार्ग उपलब्ध झाला आहे. इयत्ता ९ वी ते १२वीच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे. तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकविलेले सर्व विषयांचे व्हिडीओ सोप्या भाषेत या ऍपमध्ये उपलब्ध असणार आहेत. मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांचा अभ्यासक्रम या ऍपमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी हवे तिथे हवे तेव्हा अभ्यास करू शकतात. याचा फायदा राज्यातील दुर्गम भागातील, तळागाळातील विद्यार्थीही घेऊ शकतात. रोबोमेट प्लस ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

Leave a Comment