फॉक्सकॉन नवी मुंबईत करणार ४जी स्मार्टफोनचे उत्पादन

foxconn
मुंबई : आपल्या ४ जी स्मार्टफोनचे उत्पादन इलेक्ट्रॉनिक जगतातील तैवानची ‘फॉक्सकॉन’ कंपनी नवी मुंबईत सुरू करणार असून मार्चपासून उत्पादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

स्मार्टफोनची निर्मिती, संशोधन आणि विकास प्रकल्पासाठी ‘फॉक्सकॉन’ने नवी मुंबईतील १५०० एकर जागेसाठी अर्ज केला असून राज्य सरकार त्यासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओसाठी ‘फॉक्सकॉन’चे ४जी स्मार्टफोन्स बनवण्यात येणार आहेत. सध्या चायनीज मोबाईल कंपनी शाओमीचे जे स्मार्टफोन आहेत, ते ‘फॉक्सकॉन’ या कंपनीनेच बनवले आहेत.

या मोठ्या प्रकल्पासाठी नवी मुंबईच्या आयटी पार्कमध्ये ‘फॉक्सकॉन’ने २ लाख स्केअर फूट जागा भाड्याने घेतली आहे. ऑगस्ट २०१५मध्येच महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याची घोषणा ‘फॉक्सकॉन’ने केली होती. त्यावेळी ३३ हजार ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आश्वासन कंपनीने दिले होते.

कंपनीने प्रकल्प विस्तारासाठी आणखी १५०० एकर जागेसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगावचा समावेश आहे. त्यानुसार ‘फॉक्सकॉन’चे अधिकारी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर जागेबाबतचा निर्णय होईल. ‘फॉक्सकॉन’ने यापूर्वी चेन्नईत नोकिया मोबाईल्सची निर्मिती केली होती. मायक्रोसॉफ्टने नोकिया विकत घेतल्यानंतर ‘फॉक्सकॉन’ने आपला चेन्नईतील तळ हलवला. त्यानंतर ‘फॉक्सकॉन’ने आपला हा तळ आंध्र प्रदेशातील श्री सिटीत बसवला. या ठिकाणी ‘फॉक्सकॉन’ने चायनीज फोन शाओमी, वन प्लस आणि असूसच्या फोनची निर्मिती केली.

या मोबाईल्सची भारतात वाढती मागणी असल्यामुळेच या कंपन्यांनी आपल्या मोबाईल्सचे उत्पादन वाढवले. त्यातच आता मोबाईल्सच्या किमती कमी होत असल्याने पुन्हा त्यांची मागणी वाढण्याची चिन्ह असल्यामुळे मोबाईल तंत्रज्ञान विकसित करण्याचा तगडा अनुभव असलेली ‘फॉक्सकॉन’ कंपनी नवी मुंबईत येत आहे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

Leave a Comment