गेली ४५ वर्षे अबाधित असलेला क्रेडीट कार्ड गिनीज विक्रम

credit
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये दरवर्षी नवनवीन विक्रम नोंदविले जात असतात. ते वेळोवेळी प्रसिद्धही केले जातात. मात्र गेली ४५ वर्षे या बुकमधील एक विक्रम आजही अबाधित आहे व तो आहे क्रेडीट कार्ड विक्रम. वॉल्टर कावानाग यांच्या नावावर हा विक्रम असून त्याच्याकडे १४९७ क्रेडीट कार्डस आहेत. तसेच १७ लाख अमेरिकन डॉलर्सचे क्रेडीट कार्डही आहे. त्यामुळे वॉल्टरला मि. प्लॅस्टीक फॅन्टास्टिक असा किताबही मिळाला आहे.

असे समजते की वॉल्टरला क्रेडीट कार्ड घेण्याचा छंद १९६० पासून आहे. मात्र त्या संदर्भातला विक्रम त्याच्या नावावर १९७१ साली नोंदला गेला. १९६० साली त्याची मित्राबरोबर पैज लागली की एक वर्षात जो जास्त क्रेडीट कार्ड घेईल त्याला हरलेल्याने रात्री जेवण द्यायचे. वॉल्टरने १ वर्षात १४२ क्रेडीट कार्ड घेतली तर त्याचा मित्र १३८ कार्ड घेऊ शकला. म्हणजे वॉल्टरने पैज जिंकली पण तेव्हापासून त्याला क्रेडीट कार्ड घेण्याचा छंद लागला. आज त्याच्याकडे पेट्रोल पंप, विमा कंपन्या, बार, आईस्क्रीम स्टेशन अशी अनेक प्रकारची क्रेडीट कार्ड आहेत.

वॉल्टर सांगतो माझ्याकडे १४९७ प्रकारची क्रेडीट कार्ड आहेत मात्र मी त्यातील एखादेच वापरतो व महिनाअखेरी त्याचे बिल चुकते करतो.त्याच्या संग्रहात एक स्टर्लींग सिल्व्हर कार्डही आहे आणि अमर्यादित क्रेडीट सुविधा असलेले कार्डही आहे.