आता एटीएममध्ये मिळणार वाहन विमा

insurance
नवी दिल्ली – आपल्या कार, दुचाकी आणि अन्य वाहनांसाठी विमा खरेदी करणे आणखी सोपे होणार असून बँकेच्या एटीएममध्ये विमा खरेदी करण्याची संधी कंपन्या देणार आहेत. मोटर विमा काढणे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सोपे जाणार आहे. तसेच याव्यतिरिक्त विमा नियामक मंडळ इरडा हे देशातील सर्व राज्यांमध्ये ई-मोटर विमा प्रणाली लागू करण्यासाठी चर्चा करत आहेत. तेलंगण हे देशातील पहिले राज्य बनले आहे, ज्यामध्ये ई-मोटर विमा प्रणाली लागू करण्यात आली आहे.

विमा क्षेत्रातील तज्ञांनुसार, मोटर विमा काढणे सोपे करण्यासाठी भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) नव्या प्रणालींबाबत चर्चा करत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती बँकेच्या एटीएममध्ये जाऊन मोटर विमा काढू शकतो. यासाठी इरडा भारतीय रिझर्व्ह बँकेबरोबरही चर्चा करत आहे. सध्या एटीएममध्ये देण्यात येणाऱया बँक शिल्लकी तपासणे, पैसे दुसऱया खात्यामध्ये पाठविणे या सेवा देण्यात येत आहे. या सेवांप्रमाणेच ग्राहकांना आता मोटर विम्याचा पर्याय देण्यात येणार आहे. ग्राहक आपल्या वाहनाची पूर्ण माहिती दिल्यानंतर विमा काढण्यात येणार आहेत. विम्याचे पैसे खाते धारकाच्या बँक खात्यातून जमा करण्यात येणार आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला तेलंगण ई-मोटर विमा काढण्याची सेवा देणारे पहिले राज्य बनले आहे. दुसऱया राज्यांमध्ये ई-मोटर विमा प्रणाली लागू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. एटीएममध्ये विमा काढल्यानंतर ग्राहकांना क्यूआर कोड देण्यात येणार आहे. हा कोड पोलिसांसह अन्य अधिकाऱयांना दाखविल्यानंतर त्याची सत्यर्तता पडताळून पाहण्यात येणार आहे. अशा स्वरुपामध्ये डिजिटल स्वरुपात पॉलिसी येणार आहे. ग्राहकांना आता कागदपत्रांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासणार नाही.