बीएसएनएल देशात ४० हजार वायफाय हॉटस्पॉट उभारणार

bsnl
दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने त्यांची फोरजी सेवा देण्यातील कमतरता दूर करून या क्षेत्रातही आपले आव्हान टिकविण्यसाठी देशभरात ४० हजार ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट उभारण्याचा निर्णय घेतला असून येथे फोर जी पेक्षाही अधिक गतीमान इंटरनेट सेवा ग्राहकांना मिळू शकणार आहे.

या विषयी माहिती देताना बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणाले, आमच्याकडे आवश्यक स्पेक्ट्रम नसल्याने आम्ही फोर जी सेवा देऊ शकत नाही. मात्र फोर जी सेवा देणार्‍या खासगी कंपन्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. अधिक गतीमान सेवा देणार्‍या वायफाय हॉटस्पॉट केंद्रांची उभारणी आम्ही हाती घेतली असून आत्तापर्यंत अशी ५०० केंद्रे सुरूही झाली आहेत. या वर्षात आणखी २५०० केंद्रे सुरू करण्यात येईल व टप्प्याटप्प्याने देशभरात अशी ४० हजार केंद्रे सुरू होतील. मोबाईल सेवा सुधारण्यासाठी देशात २५ हजार नवीन टॉवर्सही उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉल ड्राॅपबाबत बोलताना ते म्हणाले की मोबाईल टॉवरमधून निघणारी किरणे आरोग्याला घातक असल्याच्या गैरसमजातून अनेक शहरातील दाट वस्तीतील टॉवर हटविले गेले आहेत. त्यामुळे कॉल ड्राॅपची समस्या आली आहे. बीएसएनएल ची आर्थिक तूट हळूहळू कमी होत आहे आणि २०१८-१९ पासून आम्ही निव्वळ नफा कमावू शकू असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment