पठाणकोटच्या हल्ल्यानंतर…

pathankot
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून काही हल्ले झाले. नंतर नरेंद्र मोदी यांनी कडक भूमिका स्वीकारल्यानंतर ते हल्ले काही प्रमाणात कमीसुध्दा झाले. देशाच्या अंतर्गत भागात तर गेल्या दोन वर्षात पाकिस्तानी अतिरेक्यांना कोठेही हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. फक्त सीमा भागात त्यांचे तीन हल्ले झाले. आता याच मालिकेमध्ये पठाणकोटचा हल्ला झाला आहे. आपल्या देशामध्ये जेव्हा अतिरेकी हल्ले होतात तेव्हा आपण एकजुटीने त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी आपल्या देशातल्या विरोधी पक्ष आधी सरकारवर हल्ला करतात. दोघांनी मिळून दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करण्यात धन्यता मानतात तेव्हा देशाची चुकीची प्रतिमा जगात निर्माण होते. आज कॉंग्रेसचे कार्यकर्ते पठाणकोट हल्ल्याबद्दल याच न्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोष देत आहेत. विशेषतः नरेंद्र मोदी यांनी सातत्याने परदेश दौरे करून जगात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. तिच्यामुळे जळफळाट होत असलेले कॉंग्रेसचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्यावर विशेषत्त्वाने आगपाखड करत असून त्यांची परराष्ट्र नीती फसली आहे असे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवसनेसारखे प्रादेशिक पक्ष तर पाकिस्तानला आपण कायम शत्रू मानले पाहिजे असे मानत असतात आणि असे पक्ष तर छोटा मोठा हल्ला झाला तरी लगेच तलवार उपसून सरकारवर धावून येतात. मग पठाणकोट सारखा मोठा हल्ला झाल्यास तर शिवसेना नेत्यांच्या जिभा आणि लेखण्यासुध्दा तलवारीचे रूप धारण करतात यात नवल ते काय? गेल्याच आठवड्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट दिली आणि त्याच्या पाठोपाठ हा पठाणकोटचा हल्ला झाला. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेला दौरा आणि हा हल्ला यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यातलाही वावदूकपणा लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असाच लाहोरचा अचानक दौरा केला होता आणि त्यानंतर पाठोपाठच कारगीलचे युध्द पाकिस्तानने आपल्यावर लादले होते. या योगायोगाचाही संबंध पठाणकोटच्या हल्ल्याशी लावला जात आहे. परंतु कारगीलचे युध्द आणि पठाणकोटचा हल्ला या गोष्टींचा संबंध वाजपेयी आणि मोदी यांच्या पाकिस्तान दौर्‍याशी लावणे हे तर्कशुध्द नाही. भारताचे पंतप्रधान स्वतःहून पुढाकार घेऊन पाकिस्तानशी मैत्री करायला जातात आणि पाकिस्तान मात्र तोंडदेखलेपणाने मैत्रीचे नाटक करून नंतर काही दिवसातच भारतावर हल्ला करून पंतप्रधानांच्या पाक भेटीमागच्या भावनेचा चोळामोळा करून टाकतात.

पाकिस्तानचे नेते असे वागत असतानाही आपले पंतप्रधान मात्र निमंत्रण नसताना त्यांच्या दौर्‍यावर जातात हे दुबळेपणाचे लक्षण आहे असे विश्‍लेषण काही लोक करतात. परंतु या दोन्ही घटनांकडे नीट पाहिल्यास भेटी आणि हल्ला यांचा काही संबंध आहे असे दिसत नाही. ९९ साली वाजपेयी लाहोरला गेल्यानंतर लगेच हल्ला झाला परंतु त्या हल्ल्याचे स्वरूपच असे होते की त्यांची तयारी फार पूर्वीपासून सुरू होती. वाजपेयी लाहोरला जाण्याच्या कितीतरी दिवस आधी ती सुरू झाली होती. ती तयारी काही आठवडाभरात होणारी नव्हती. तीच गोष्ट आताच्य पठाणकोटच्या हल्ल्याला लागू आहे. नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेल्यानंतर या हल्ल्याची योजना केली गेली असे काही दिसत नाही कारण एवढ्या मोठ्या हल्ल्याची योजना चार-पाच दिवसात आखता येत नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा अतिरेकी हल्ला झाला की काही तज्ञ पत्रकार सरकारची गुप्तचर यंत्रणा फसली की असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. अजून हल्ला संपलेलासुध्दा नाही. कारवाई अजून सुरू आहे. तोपर्यंत निष्कर्षही जाहीर होतो. ही काय कमाल आहे समजत नाही. वास्तविक पाहता पंजाबवर हल्ला होऊ शकतो याचा अंदाज गुप्तचर यंत्रणांना आला होता.

ज्या ज्या वेळी पाकिस्तानातले राज्यकर्ते भारताशी आणि भारताचे राज्यकर्ते पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करतात त्या त्या वेळी पाकिस्तानातील अतिरेकी आणि लष्कर हातमिळवणी करून अशा प्रकारचे हल्ले करतात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परदेश दौर्‍यावर असताना नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांना भेटले, त्या दौर्‍यावरून परत आल्यानंतर नवाज शरीफ यांनी पाकिस्तानातल्या भारतद्वेष्ट्या संघटनांना आणि शासनातल्या काही नेत्यांना भारत विरोधी विधाने न करण्याचा इशारा दिला. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानला गेल्या तेव्हापासूनच हे दोन देश जवळ येण्याचे संकेत मिळायला लागले. तेव्हापासूनच पाकिस्तानातल्या या शक्ती जाग्या व्हायला लागल्या होत्या आणि त्यांनी तेव्हापासून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. अलीकडच्या काळात पाकिस्तानातल्या या भारतविरोधी घातपाती संंघटनांनी जम्मू काश्मीरच्या ऐवजी पंजाबला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. पंजाबमधले काही लष्करी तळ पाकिस्तानाजवळ आहेत. त्याचा फायदा घेऊन पंजाबात हे हल्ले होत आहेत. या हल्ल्याची कल्पना आपल्या गुप्तचर यंत्रणांना आलीही होती. परंतु नेमका कोणता ठिकाणी हल्ला होणार याचे स्वरूप कळले नव्हते. मात्र नंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आणि पठाणकोट हल्ल्याचा प्रतिकार त्यांनी केला. त्यात भारताचे सात जवान आणि अधिकारी शहीद झाले त्यांना आपण श्रध्दांजली वाहिली पाहिजे.