नासाच्या हबल दुर्बिणीला छायाचित्रे टिपण्यात प्रथमच यश

nasa
वॉशिंग्टन : नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीने पृथ्वीपासून २३ कोटी प्रकाश वर्षे दूर असलेल्या दोन दीश्घकांचे मिलन प्रथमच चित्रीत केले आहे. शौरी तारकापुंजात (हरक्युलिस) या दीश्घका आहेत. अतिशय विलोभनीय अशी ही प्रतिमा नासा व यूरोपीय अवकाश संस्थेच्या कॅमे-यांनी टिपली आहे.

ही छायाचित्रे प्रथम बघितल्यानंतर ती विचित्र आकाराची एकच दीश्घका आहे, असे वैज्ञानिकांना वाटले; परंतु त्यात दोन दीश्घकांचे मिलन होताना दिसत आहे, त्यातून नवी बाल दीश्घका जन्म घेत असते. यातील मोठी दीश्घका एनजीसी ६०५२ क्रमांकाची आहे. नासा वैज्ञानिकांनी सांगितले की, आधी त्या दोन दीश्घका होत्या. आता गुरुत्वीय आकर्षणामुळे त्या एकमेकांकडे ओढल्या गेल्या. एकमेकांवर आपटल्या. आता त्यातील ता-यांच्या कक्षा बदलत असून तारे नवीन मार्गाने जातील. या आघाताच्या प्रक्रियेत बराच प्रकाश बाहेर पडत असतो व तो दुर्बिणींच्या माध्यमातून दिसतो. आघातानंतर त्यातून संमिलन होऊन लगेच नवी बाल दीश्घका तयार होत नाही, त्यासाठी लाखो वर्षे लागतात. नंतर स्थिर होऊन बाल दीश्घकेचा (गॅलॅक्सी) जन्म होतो. जी नवीन दीश्घका जन्माला येईल ती ज्या दोन दीश्घकांच्या मिलनातून तयार झाली त्या दोनही दीश्घकांपेक्षा वेगळी असेल. तिचा आकारही वेगळा असेल. गुणधर्मही वेगळे असतील, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

नासाने निवेदनात म्हटले आहे की, विचित्र आकाराची दीश्घका असली तरी ती नवीन आहे व बाल दीश्घकांचा जन्म सुरू आहे. ज्या हबल दुर्बिणीने अवकाशातील दोन दीश्घकांच्या मिलनाचा सोहळा बघितला आहे ती १९९० मध्ये सोडण्यात आली होती. तिच्यावर ७.९ फुटांचा आरसा आहे. त्यातील चार साधने ही अतिनील, दृश्य व अवरक्त किरणांचे निरीक्षण करतात. या दुर्बिणीला एडविन हबल या अवकाशसंशोधकाचे नाव दिलेले आहे. या दुर्बिणीने आतापर्यंत अनेक खगोलशास्त्रातील घटनांची अतिशय विलोभनीय छायाचित्रे पाठवली आहेत.

Leave a Comment