वेगाने माहिती वहन करणा-या सूक्ष्म संस्कारकाची निर्मिती

microprossesor
वॉशिंग्टन : अतिशय वेगाने माहिती वाहून नेणारा सूक्ष्ममाहिती संस्कारक म्हणजे मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला असून या प्रकल्पात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचा समावेश आहे. प्रकाशाच्या मदतीने यात माहिती वाहून नेली जाते, या माहिती देवाण-घेवाणीस सर्वांत कमी ऊर्जा लागते. अधिक वेगवान व शक्तिशाली संगणकप्रणाली व पायाभूत यंत्रणेची निर्मिती यातून शक्य होणार आहे. प्रकाशावर आधारित समाकलित मंडले (इंटिग्रेटेड सर्किट्स) या नव्या पद्धतीमुळे संगणनात अनेक महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत. त्यांचा वापर स्मार्टफोन व महासंगणकात करता येणार आहे.

या नवीन तंत्रज्ञानाची संकल्पना आधीच मांडण्यात आली होती. आता ती प्रत्यक्षात येत आहे, असे बोल्डरच्या कोलॅरॅडो विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक मिलॉस पोपोविक यांनी सांगितले. पारंपरिक सूक्ष्मसंस्कारकांचा वापर सध्या लॅपटॉपपासून महासंगणकापर्यंत सर्व संगणकप्रणालीत केला जातो त्यात माहिती हस्तांतरासाठी इलेक्ट्रोनिक मंडलांचा (सर्किट) वापर केला जातो. अलीकडच्या काळात कुठलेही संगणन साधन तयार करताना माहितीचा वेग, माहितीचे प्रमाण व लागणारी वीज हे घटक महत्त्वाचे असतात. त्यांचा विचार करता नवीन तंत्रज्ञानांचे फायदे जास्त आहेत.

संशोधक राजेशकुमार यांनी प्रकाशाधिष्ठित तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असून त्यासाठी त्यांनी प्रकाशशास्त्र म्हणजे फोटॉनिक्सचा अभ्यास केला आहे. प्रकाशाच्या मदतीने माहिती पाठविताना वीज कमी लागते शिवाय प्रकाश जास्त अंतर विजेच्या तेवढ्याच पुरवठ्यात गाठू शकतो. प्रकाशावर आधारित संदेशवहनाचा फायदा म्हणजे माहितीचे समांतर प्रवाह सांकेतिक भाषेत वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाच्या मदतीने पाठवता येतात. ऑप्टिकल वायर वेव्हगाईडवर हे तंत्रज्ञान आधारित आहे. पोपोविक यांच्या नेतृत्वाखाली हा सूक्ष्मसंस्कारक (चिप) तयार करण्यात आला असून त्यात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूटच्या प्रा. राजीव राम यांच्या पथकाचाही यात समावेश आहे. या सूक्ष्मसंस्कारक चिपचा फायदा म्हणजे टीव्ही रिमोटमध्ये वापरले जाणारे अवरक्त किरण वापरता येतात त्यांची तरंगलांबी १ मायक्रॉनपेक्षा कमी म्हणजे केसाच्या जाडीपेक्षा कमी असते, असे पोपोविक यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment