४ कोटी १८ लाखांचा ८ पर्यटनस्थळांना निधी

eco-tourism
मुंबई : राज्याच्या वन क्षेत्रातील ८ पर्यटनस्थळांचा वन पर्यटन (इको टुरिझम) योजनेअंतर्गत विकास करण्यासाठी ४ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यात जेजुरीचा खंडोबा, औरंगाबादचे गुलशन महाल उद्यान, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवीचे (जि. वाशिम) संत सेवालाल महाराज आणि यवतमाळच्या संत मुंगसाजी महाराज समाधीस्थळांचा समावेश आहे.

यापैकी सर्वाधिक सुमारे दीड कोटीचा निधी सेवालाल महाराज समाधीस्थळांच्या विकासासाठी खर्च केला जाईल. वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्यात इको टुरिझम योजना राबविण्यात येत आहे. चालू वर्षासाठी या योजनेअंतर्गत ५० कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने वनक्षेत्रातील पर्यटनस्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची शिफारस केली होती. त्याबाबतचा शासन आदेश महसूल आणि वन विभागाने काढला आहे. राज्यात धार्मिक पर्यटनस्थळी सुविधा निर्माण करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत असते. मात्र, वन क्षेत्रातील पर्यटनस्थळे आजपर्यंत कायम उपेक्षित राहिलेली आहेत. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे इको टुरिझमच्या या योजनेस निधी मिळाल्याने त्याला आता गती मिळणार आहे.