ट्रायने फेटाळली फेसबुकची फ्री बेसिक मोहीम

facebook
नवी दिल्ली : दूरसंचार नियामक मंडळाने(ट्राय) नेट न्यूट्रेलिटीच्या विरुद्ध फेसबुकच्या फ्री बेसिक्स मोहिमेला झटका दिला असून फेसबुककडून दबाव टाकण्यासाठी फ्री बेसिक्सवर चालविण्यात येणा-या अभियानाला ट्रायने फेटाळले आहे.

याबाबत ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्री बेसिक्सवर प्रोत्साहन मिळण्यासाठी फेसबुकला मिळालेल्या १४.३४ लाख कमेंट्सच्या दबावामध्ये ट्राय येणार नाही, याचा कोणताही परिणाम ट्रायवर होणार नाही. ट्रायला मिळालेल्या सूचनेमध्ये मतदानाचा अंतर्भाव येत नाही. आम्ही नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मागितली नव्हती. किंवा त्याबाबत प्रश्न उपस्थित केले नव्हते. आम्हाला फ्री बेसिक्सवर मोठय़ा संख्येवर नागरिकांकडून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामुळे फेसबुकने चालविलेले अभियान आम्हाला मान्य नाही.

दरम्यान ट्रायवर फ्री बेसिक्सबाबत दबाव टाकण्यासाठी फेसबुकने मोठे अभियान चालविले होते. याबाबत फेसबुकने वृत्तपत्रात मोठय़ा प्रमाणात जाहिरात केली होती. तसेच टीव्हीवर मोठी मोहीम चालवली होती. मात्र या प्रकारचा कोणताही दबाव स्वीकारला जाणार नाही, असे ट्रायकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तत्पूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सला फेसबुकची फ्री बेसिक्स सेवा थांबविण्यासाठी दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय)सांगितले होते. ट्रायच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) ला काही वेळेसाठी फ्री बेसिक्स सेवा बंद करण्यासाठी सांगण्यात आले होते. याला मार्च २०१६पर्यंत बंद करण्याची मागणी ट्रायने केली होती. यानंतर फेसबुककडून अभियान चालवण्यात आले.

Leave a Comment