पृथ्वीला अवकाशातील कचऱ्याचा धोका कायम

nasa
वॉशिंग्टन – खूप मोठय़ा प्रमाणात अवकाशातील कचरा वाढला असून त्याबाबतची एक व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून जशी पृथ्वीवर कचऱ्याची समस्या भीषण आहे, तितकीच ती अंतराळातही असून या कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी डोकेदुखी झाली आहे. एक दिवस पृथ्वीवर हा कचरा धडकून धोकाही निर्माण होऊ शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या संस्थेचे स्टुअर्ट ग्रे यांनी अवकाशातील कचऱ्याबाबतचा व्हिडिओ तयार केला असून त्यात १९५७ पासून २०१५ पर्यंत अवकाशातील कचरा कसा वाढत गेला हे दाखवले आहे. रशियाने १९५७ मध्ये स्पुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हापासून अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून कचरा फार मोठय़ा प्रमाणात वाढला असून अनेक अवकाशयाने व पृथ्वीलाही या कचऱ्याचा धोका आहे, असे ग्रे यांचे म्हणणे आहे.

नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे त्यांचा आकार सॉफ्टबॉलपेक्षा जास्त आहे. नासाने गोटीएवढय़ा आकाराचा कचराही शोधला असून पृथ्वीभोवती तशा पाच लाख वस्तू फिरत आहेत. त्यापेक्षा कमी आकाराच्या कचऱ्याच्या रूपातील कोटय़वधी निरुपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. व्हिडिओतील प्रत्येक पांढरट ठिपका अवकाशातील कचरा दाखवत असून तो अनेक अवकाश मोहिमांमुळे निर्माण झालेला आहे. मानवनिर्मित कचऱ्याचा डब्ल्यूटीएफ नावाचा एक मोठा भाग पृथ्वीच्या दिशेने आला होता पण तो पृथ्वीच्या वातावरणात घर्षणाने जळून गेला. हिंदी महासागरावर श्रीलंकेनजीक ही घटना घडली होती. अवकाशातील कचरा असा पृथ्वीवर आदळला तर मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे असे काही घडण्याच्या आत हा कचरा एकतर पकडला पाहिजे किंवा यापुढे तरी फेरवापराचे प्रक्षेपक पाठवले तर असा कचरा होणार नाही.

Leave a Comment