हनुमानाची एकमेव उलटी मूर्ती

hanuman
भारतात सर्वाधिक मंदिरे कोणत्या देवाची असतील याचा अंदाज आहे? येथे सर्वाधिक मंदिरे आहेत हनुमानाची. हनुमानाच्या विविध पोझमधल्या मूर्ती या देवळांतून पाहायला मिळतात. अगदी झोपलेला हनुमान सुद्धा. मात्र पाय आकाशाकडे आणि डोके जमिनीकडे अशा उलट्या अवस्थेतील हनुमानाची मूर्ती पाहायची असेल तर इंदोर जवळ असलेल्या सांवेर गावाला जायला हवे. इंदोरपासून २५ किमीवर उज्जैन रस्त्यावर हे मंदिर आहे आणि पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचेही आहे.

असे सांगतात ही मूर्ती रामायणातील पाताळविजय प्रसंगाच्या विजयाचे प्रतीक आहे. रामायणात रामरावण युद्ध सुरू असताना रावणाचा मित्र अहिरावण याने वेष बदलून रामाच्या सेनेत प्रवेश केला आणि रात्री सर्वजण झोपेत असताना मायावी शक्तीने राम लक्ष्मणाला बंदी बनवून पाताळात नेले. सकाळी राम लक्ष्मण दिसत नाहीत म्हटल्यावर वानरसेना घाबरली. त्यांचा शोध घेऊ लागली तेव्हा कबुतराच्या बोलण्यातून त्यांना पाताळात नेले गेल्याचे हनुमानाला समजले. तेथे राम लक्ष्मणाचा बळी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजताच हनुमानाने पाताळात जाऊन राम लक्ष्मक्षाचा शोध घेतला.

राम लक्ष्मण सापडले आणि हनुमानासह राम लक्ष्मणानी अहिरावणाशी युद्ध करून त्याचा पराभव केला त्यानंतर हनुमान त्या दोघांना सुरक्षितपणे पाताळातून बाहेर घेऊन आला. जेथे हनुमान पाताळात गेला ती हीच जागा असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथे या रूपातील हनुमान विराजमान आहेत. ही मूर्ती चमत्कारी असल्याचेही मानले जाते. या मूर्तीच्या नुसत्या दर्शनानेच सर्व समस्या दूर होतात अशीही श्रद्धा आहे. या मंदिरात हनुमानाबरोबरच रामसीता व शिवपार्वतीच्याही मूर्ती आहेत.

Leave a Comment