राजमुंद्री- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तपेश्वरम येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या ८ हजार किलोच्या लाडूची नोंद झाली असून सलग पाचव्या वर्षी हा लाडू स्थानिक मिठाई विक्रेत्यांनी बनवला होता.
गिनीज बुकात पोहचला आंध्रप्रदेशातील ८ हजार किलोचा लाडू
सलग पाच वर्ष ८ हजार किलोचा लाडू बनवण्याचा विक्रम आम्ही केला असून आम्हाला गिनीज बुकने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. आम्हाला या वर्षी हा पुरस्कार गणरायाच्या आशिर्वादामुळे आणि आमच्या सहका-यांच्या अफाट मेहनतीमुळे मिळाला आहे, असे तपेश्वरम मधील श्रीभक्त अंजनीया मिठाई दुकानाचे मालक सलादी व्यंकटेश्वर राव म्हणाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार,आंध्रप्रदेशातील तपेश्वरम शहरातील अंजनीया मिठाई विक्रेत्याने जगातील सर्वाधिक वजनाचा लाडू बनवला आहे. हा लाडू ८,३६९ किलो वजनाचा असून तो व्यंकटेश्वर राव आणि त्यांच्या सहका-यांनी गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी तयार केला होता. गणेशोत्सवादरम्यान विशाखापट्टणम येथे स्थापित केलेल्या गणेशमूर्तीसाठी राव आणि सहका-यांनी हा लाडू तयार केला होता. ‘गतवर्षी आम्ही दोन महालाडू तयार केले होते. त्या लाडूचे वजन ८ हजार किलो आणि ६ हजार किलो असे होते. हे दोन्ही लाडू आम्ही अनुक्रमे विशाखापट्टणम् आणि विजयवाडा येथे स्थापित केलेल्या गणेशमूर्तीना अर्पण केले’, असे राव म्हणाले.