गारठ्यामुळे द्राक्ष उत्पादकांना तब्बल दीडशे कोटींचा फटका!

grapes
नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली असून, फळबागांबरोबरच रबी पिकांनाही या गारठ्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. एक तर हिव पडल्याने आंब्याला मोहोर येण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत, तर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांना याचा जबर फटका बसणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ७.४ अंशांपर्यंत तापमान घटल्यामुळे जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांचे जवळपास दीडशे कोटींचे नुकसान होऊ शकते. एवढेच नव्हे, तर किमान ४० हजार एकरांमधील निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादनही घटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

नाशिक जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. महाराष्ट्र अगोदरच दुष्काळाशी सामना करीत आहे. त्यातूनही थेंब-थेंब पाण्याने फळबागा आणि काही ठिकाणी रबी पिके जगवली आहेत. परंतु या पिकाला दृष्ट लागली असावी. कारण गेल्या चार-पाच दिवसांत थंडीचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादकांची प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटू शकतो. त्यामुळे ऐन दुष्काळात शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. अगोदरच द्राक्ष बागा जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यातच निसर्गाची अवकृपा चिंता वाढविणारी आहे.

Leave a Comment