फेसबुकचा अतिवापर म्हणजे व्यसनाधिनता नव्हे !

facebook
वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनात जे लोक फेसबुक जास्त प्रमाणात वापतात ते नवीन व्यक्तींचा शोध समाज माध्यमातून घेत असतात व त्यातून त्यांचे त्या माध्यमावरील अवलंबित्व समजते असे दिसून आले आहे. असे असले तरी फेसबुकवरील हे अवलंबित्व वाईट नाही, असे अरकॉन्स विद्यापीठाच्या वायने महाविद्यालयाच्या संज्ञापन विषयाच्या सहायक प्राध्यापिका अम्बेर फेरिस यांनी सांगितले.

फेसबुक यूजर ट्रेंडसचा फेरिस यांनी अभ्यास केला असून त्यांनी सांगितले की, जास्तीत जास्त लोक फेसबुकवर त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी येतात व ते त्यावर अवलंबून असतात. त्यांचे अवलंबित्व म्हणजे व्यसनाधिनता नसते, लोक फेसबुक ज्या प्रमाणात वापरतात त्यावरून त्यांचे त्या माध्यमावरील अवलंबित्व कळते. जे लोक फेसबुक वापरतात त्यांना त्या माध्यमातून नवीन लोक भेटतात. फेसबुकवरील अवलंबित्वा मागील घटक शोधण्यासाठी अमेरिकेतील केन्ट स्टेट विद्यापीठाच्या एरिन हॉलेनबॉग व फेरिस यांनी १८ ते ६८ वयोगटांतील ३०१ फेसबुक वापरकत्र्यांचा एक महिना अभ्यास केला. त्यांच्या मते व्यक्ती फेसबुक वापरून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. जे लोक फेसबुक वापरतात त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान जास्त असते, पण त्यांचा आत्मसन्मान कमी असतो. आपण जिमला जातो असे लिहिणे, एखाद्या राजकीय प्रश्नांवर भूमिका मांडणे, एखाद्या व्यक्तिगत आव्हानात फेसबुकचा आधार घेणे असे ते करीत असतात.

फेरिस यांनी सांगितले की, काही वापरकर्ते त्यातून त्यांच्यासारखी परिस्थिती असलेल्या लोकांकडून आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा घेतात व त्यांना काही महत्त्वाचे दृष्टिकोनही कळतात. फेसबुकचा वापर माहिती व करमणुकीसाठी केला जातो. मागील अभ्यासानुसार फेसबुकमुळे व्यक्तिमत्त्व समजण्यास मदत होते. काही फेसबुक वापरकत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात साम्य असते. काही लोक फेसबुकचा वापर नव्या नातेसंबंधासाठी करतात. बहिर्मुख व्यक्ती त्यांची मते व माहिती मोकळेपणाने मांडतात, पण ती नेहमीच खरी नसते. अंतर्मुख माणसे माहिती उघड करीत नाहीत. जास्त सकारात्मक पोस्ट या आत्मविश्वास असलेल्या लोकांकडून येतात. ते लोक अगोदरच माहिती असलेल्या लोकांच्या संपर्कात राहतात व लोकांचे लक्ष वेधून घेतात. तुम्ही जर जीवनात सुखी असाल तर तुम्ही समाजमाध्यमांवर सुख वाटत असतात असे फेरिस यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment