आता रोबोटिक सर्जरी भारतातही शक्य

robotic-surgery
नवी दिल्ली : भारतातील वैद्यक क्षेत्रातील गुणवत्तेला जगात तोड नाही, डोके आणि मानेच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेच्या पद्धतीत भारताने घडवून आणलेले परिवर्तन नोंद घेण्यासारखे आहे. लवकरच रोबोटिक्स सर्जरी (यंत्रमानवाच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया) करणेही भारतात सहज शक्य होणार असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. ख्रिस होलसिंगर यांनी व्यक्त केले आहे. होलसिंगर हे स्टॅनफोर्ड कॅन्सर सेंटरमध्ये डोके आणि मानेच्या कर्करोगाच्या विभागात कार्यरत असून, ते २००८ पासून भारतातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करत आहेत.

भारतातील रुग्णालयांसोबत काम करण्यात मला मोठा आनंद येतो, असे त्यांनी नमूद केले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी देशातील दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांना मानेचा आणि डोक्याचा कर्करोग होतो, तीन-चतुर्थांश रुग्ण हे मुख, गळ्याशी संबंधित कर्करोगाचे असतात. स्टॅनफोर्ड मेडिकल सेंटर भारतातील अनेक वैद्यकीय संस्थांसोबत काम करते आहे. दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रीसर्च सेंटर आणि मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलशीदेखील या केंद्राचे थेट संबंध आहेत. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने ह्युमन पापिलोमा व्हायरसवर (एचपीव्ही) संशोधन केले जाते.

भारतात कर्करुग्णाच्या एचपीव्हीसाठी घेण्यात आलेल्या ८० टक्के चाचण्यांचे निष्कर्ष निगेटिव्ह असल्याचे होलसिंगर यांनी नमूद केले. एचपीव्ही निगेटिव्ह असल्यास तो रेडिओथेरपीस दाद देत नाही. अमेरिकेतील डोके आणि मानेच्या कर्करुग्णांच्या एचपीव्ही चाचण्यांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथे रेडिओथेरपीच्या माध्यमातून सहज उपचार करता येतात. याबाबत अमेरिकेत आणखी संशोधन होत आहे. रेडिओथेरपी आणि रोबोटिक्स सर्जरी या दोन उपचारपद्धतींमध्ये कधीच स्पर्धा होऊ शकत नाही, या दोन्ही उपचारपद्धती परस्परांनापुरक असल्याचे होलसिंगर यांनी नमूद केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment