मिसाईल मॅन आता चॉकलेट मॅनही

kalam
भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पाँडीचेरीतील चॉकलेट बुटीक झुका तर्फे त्यांच्या वार्षिक उत्सवाचे निमित्त साधून अनोखा सन्मान दिला गेला आहे. या दुकानाचे मालक श्रीनाथ बालचंद्रन आणि शेफ राजेंद्र थंकारसु यांनी सतत १८० तास काम करून कलाम यांचा पूर्ण पाच फुटाचा चॉकलेटचा पुतळा तयार केला आहे. त्यासाठी त्यांना ४०० किलो चॉकलेट लागले. हा पुतळा पाहण्यासाठी लोक अमाप गर्दी करत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो लोकांना पाहण्यासाठी खुला ठेवला जाणार आहेच पण हा पुतळा विक्रीसाठी नाही असेही जाहीर केले गेले आहे.

याविषयी बोलताना बालचंद्रन म्हणाले, आम्ही दरवर्षी वार्षिक उत्सव करतो. मात्र यंदा आम्ही फेसबुकच्या माध्यमातून सर्वेक्षण करून कोणाचा चॉकलेट पुतळा बनवावा यासाठी मते मागविली होती. तेव्हा कलाम यांच्या नावाला अधिक पसंती मिळाली. अर्थात चॉकलेटमध्यें पाच फूट उंचीचा पुतळा बनविणे हे अवघड आव्हान होते मात्र आम्ही पेलले आहे. यापूर्वी म.गांधी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मिकी माऊस, व्हिंटेज ट्रेन, संगीत वाद्ये चॉकलेटमध्ये बनविली गेली होती मात्र ती छोट्या आकारात होती. इतका मोठा पुतळा प्रथमच बनविला गेला आहे आणि अनेक शाळांनी आमच्याशी संपर्क साधून मुलांना तो दाखवायला आणत असल्याचे कळविले आहे.

Leave a Comment