हिपॅटीटिससचा विळखा

hapetits
साधारणतः हिपॅटीटिस बी या विकाराविषयी लोकांमध्ये फार जागृती निर्माण झालेली नाही. त्यामुळे या विकाराने आपल्याला कितपत विळखा घातलेला आहे याबाबत लोक अनभिज्ञ आहेत. विशेषतः हिपॅटीटिस बीचे विषाणू शरीरात प्रवेश करतात तेव्हा कोणालाच त्रास होत नाही. बरीच वर्षे हे जंतू शरीरामध्ये पडून राहतात मात्र त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ते शरीरावर हल्ला करतात. मग त्यातून लिव्हरचा कॅन्सरसुध्दा होऊ शकतो. भारतामध्ये जवळपास ५ कोटी लोकांच्या शरीरामध्ये हिपॅटीटिस बीचे विषाणू आहेत असा वैद्यकीय तज्ञांचा दावा आहे.

हे विषाणू शरीरात प्रवेश करतात ते मात्र संसर्गामुळे. अन्य लोकांचा टुथब्रश वापरणे किंबहुना दाढीचे रेझर दुसर्‍याचे वापरणे अशातूनही हा संसर्ग होऊ शकतो. चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन यानेही नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे आणि आपल्या शरीरामध्ये हिपॅटीटिसचे बीचे विषाणू असल्याचे जाहीर केले आहे. गंभीर आजारी असताना अमिताभ बच्चनला ६० बाटल्या रक्त चढवण्यात आले होते. त्यातून ही बाधा झाली असल्याचे त्याने सांगितले.

आपल्या समाजामध्ये स्वच्छता किंवा संसर्ग टाळणे या गोष्टीविषयी प्रचंड अनास्था आहे. स्वच्छेतेचे नियम पाळले पाहिजेत असे आपल्याला सांगितले जाते परंतु हे नियम एवढ्या कसोशीने पाळण्याची खरीच गरज आहे का असा प्रश्‍न विचारून नियम सांगणार्‍यांची चेष्टा केली जाते. मात्र अशा नियमांचा भंग करण्यातूनच संसर्ग होतो आणि नंतर काही वर्षांनी त्यातून आजार उद्भवतात. त्यावेळी मात्र आपण पूर्वी स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत म्हणून आपल्यावर ही पाळी आली. ही गोष्ट समजतसुध्दा नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही