पश्चिम बंगालमध्ये देशातील पहिले अनुदानित संस्कृत विद्यापीठ

college
कोलकाता – ‘संस्कृत कॉलेज अँड युनिव्हर्सिटी-२०१५’ हे विधेयक पश्चिम बंगाल विधानसभेने मंजूर केल्याने कोलकात्यातील २०० वर्षांच्या जुन्या संस्कृत महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. शासनाकडून अर्थसाहाय्यासह मान्यता लाभल्याने हे संस्कृत विद्यापीठ देशातील पहिले संस्कृत विद्यापीठ ठरणार आहे, असे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तशी उत्तरप्रदेश, बिहार व ओडिशामध्ये संस्कृत विद्यापीठे कार्यरत असली तरी शासकीय मान्यतेमुळे कोलकाता संस्कृत विद्यापीठाला वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे.

हे विद्यापीठ २०१६ च्या शैक्षणिक वर्षापासून चालू होणार असले तरी प्रतिज्ञापत्रामधील त्याची नोंद लवकर करण्यात येणार असल्याचे समजते. संस्कृतच्या अभ्यासासाठी एक आदर्श केंद्र असावे, ही आमची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी या विषयाला विद्यार्थी व शिक्षक लाभल्याने ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे संस्कृतला जुने वैभव फिरून प्राप्त होईल, असे चॅटर्जी यांनी सांगितले.

हे संस्कृत महाविद्यालय १८२४ मध्ये स्थापन झाले असून देशातील अत्यंत जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक समजले जाते. ईश्वरचंद्र विद्यासागर तसेच हरप्रसाद शास्त्रासारखे अध्यापक त्याला १९ शतकामध्ये लाभले होते. त्याच्या वाचनालयात २२ हजार हस्तलिखित ग्रंथही आहेत.