जास्त वेळेच्या झोपेचा आयुर्मानावर परिणाम; ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचा दावा

sleep
मेलबर्न : आरोग्यास अपुरी झोप घातक असते, हे बहुधा प्रत्येकालाच माहीत आहे. पण दीर्घकाळ झोपणा-यांनाही आरोग्यासंदर्भातील दुष्परिणामांना सामोर जावे लागते. दररोज अधिक वेळ झोपणे आणि एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा प्रकारची असंतुलित जीवनशैली असणा-यांचे आयुर्मान कमी होते, असा दावा ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी केला आहे.

यासंदर्भात एक अभ्यास मेलबर्न येथील सॅक्स संस्थेने केला असून त्यांनी ४५ आणि त्यावरील वयोगटातील लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीचे परिक्षण केले. नऊ किंवा त्यापेक्षा जास्त तास झोप घेणा-या, व्यायामाचा अभाव असणा-या आणि दिवसभरात एकाच जागेवर बसून काम करणा-या लोकांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचा निष्कर्ष त्यांनी या अभ्यासाअंती काढला. दिवसभरात सात तासांपेक्षा अधिक काळ एकाच जागी बसण्याची सवय आणि अतिशय अल्प व्यायामामुळे आठवडाभरातील आयुष्याची १५० मिनिटे कमी होत असल्याचे या शास्त्रज्ञांनी निरीक्षणातून नोंदविले आहे. अल्प शारीरिक श्रम असलेली मिश्रणयुक्त जीवनशैली तुम्हाला तीन पटींनी घातक परिणामांना सामोरे जाण्यास पुरेसे आहे, असे मत सिडनी विद्यापीठाच्या आणि संशोधनाच्या प्रमुख मेलोडी डिंग यांनी व्यक्त केले. जर आपण जोखीम वाढवणा-या या घटकांचा गांभीर्याने विचार केला नाही, तर नक्कीच ही जीवनशैली शरीराला घातक ठरू शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. संशोधकांनी मृत्यू आणि विविध आजार यांच्याशी निगडित जीवनशैली अभ्यासताना धूम्रपान, अधिक मद्यपान, अतिअल्प आहार आणि शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम असणा-यांच्या जीवनशैलीचे अवलोकन केले. त्यानंतर आलेल्या विविध प्रकारच्या निष्कर्षांतून मुत्यू होण्यासाठी कारणीभूत कारणांच्या नोंदी संशोधनातून केल्या गेल्या. याच निरीक्षणातून नियमित वेळेपेक्षा जास्त झोप, बसण्याची सवय आणि अल्प व्यायामासोबत अल्कोहल, धूम्रपान आणि सात तासांपेक्षा कमी झोप असणा-यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment