फोर्ब्सच्या उद्योग यादीत भारत ९७ व्या स्थानी

forbes
नवी दिल्ली : फोर्ब्सने तयार केलेल्या यादीत उद्योग आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने १४४ देशांत भारत ९७ व्या स्थानी असल्याचे म्हटले असून २०१५ च्या या यादीत कजाकिस्तान आणि घानाच्याही मागे भारत असल्याचे दाखवल्यामुळे जागतिकदृष्ट्या भारताची उद्योग क्षेत्रात घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

भारत व्यापार, आर्थिक धोरण, भ्रष्टाचार आणि हिंसात्मक कारवाया या सारख्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरू लागला आहे. उद्योग आणि इतर बाबींवरही याचा परिणाम होत आहे. फोर्ब्सच्या या यादीत डेन्मॉर्क पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेचीही यावेळी ४ अंकांनी घसरण झाली असून, ती २२ व्या स्थानावर आली आहे. २००९ मध्ये अमेरिका दुस-या स्थानी होती. परंतु त्यानंतर त्यांची दरवर्षी घसरण सुरूच राहिलेली आहे. अमेरिका जगाची आर्थिक राजधानी आहे आणि १७ हजार ४०० अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, आर्थिक धोरण आणि नोकरशाही याबाबत त्यांचे प्रदर्शन प्रभावी राहिलेले नाही. फोर्ब्सच्या यादीत भारत ९७ व्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. परंतु भारताचा खुल्या अर्थव्यवस्थेकडे कल वाढला आहे. तथापि, जुन्या धोरणातील काही अंश अद्याप कायम आहेत, असे म्हटले आहे. तथापि, युवा शक्ती, कमी झालेले परावलंबित्व, चांगली बचत आणि गुंतवणूक तथा वैश्विक अर्थव्यवस्थेशी वाढलेला समन्वय हे पाहता भारताची दीर्घकालिन वृद्धी सकारात्मक असल्याचेही फोर्ब्सने म्हटले आहे.

एकीकडे सकारात्मक पाऊल पडत असले, तरी भारतासमोर बरीच आव्हाने आहेत. त्यामुळे ती मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, महिला-मुलींबाबत भेदभाव तथा हिंसाचाराच्या घटना, अकुशल वीज उत्पादन, वितरण, कृषि-परिवहन क्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव, कृषि क्षेत्रात मर्यादित रोजगाराच्या संधी आदींचा समावेश आहे. याबरोबरच सबसिडीचा लाभ गरजवंतांपर्यंत न पोहोचणे, उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेल्या लोकांना शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था न होणे या बाबीही आव्हानात्मक आहेत. याबाबतचे मार्ग भारताला शोधावे लागणार आहेत. काही गोष्टींत भारताचे प्रदर्शन चांगले आहे.

गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसंबंधी भारताचा आठवा क्रमांक लागतो. नवप्रवर्तन प्रकरणात ४१ वा, व्यक्तिगत स्वातंत्र्यासंदर्भात ५७ वा आणि संपत्तीच्या अधिकारासंदर्भात ६१ वा क्रमांक लागतो. मात्र, व्यापारी स्वातंत्र्यात १२५ आणि आर्थिक स्वातंत्र्यात भारताचा क्रमांक १३९ आहे, तर लालफितशाहीत १२३ वा आणि भ्रष्टाचारात ७७ वा क्रमांक लागतो.

Leave a Comment