वॉशिंग्टन – पृथ्वीच्या सर्वात जवळच्या जीवसृष्टी फुलण्यासाठी पूरक वातावरण असलेल्या ग्रहाचा शोध संशोधकांनी आजपर्यंतच्या संशोधनात लावला असून केवळ १४ प्रकाशवर्षे हा ग्रह सूर्यमंडळापासून दूर आहे.
जीवसृष्टी फुलण्यासाठी पूरक अशी दुसरी पृथ्वी केवळ १४ प्रकाशवर्षे दूर
पृथ्वीपेक्षा चारपट जास्त या ग्रहाचे वस्तुमान आहे. संशोधकांनी वुल्फ १०६१ या तांबड्या ताऱ्याच्या भोवती हा ग्रह फिरत असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या एकूण ३ ग्रहांपैकी हा एक असल्याचेही संशोधकांनी पुढे म्हटले आहे.
तीनही ग्रहांचा पृष्ठभाग खडकाळ आणि कठीण असून या ग्रहांचे वस्तुमानही आवश्यकतेएवढे कमी असल्याने जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी ही परिस्थिती सर्वात अनुकूल असल्याचे न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील प्रमुख लेखक डंकन राईट यांनी सांगितले. या तीन ग्रहांपैकी मध्यभागी असणाऱ्या वोल्फ १०६१सी या ग्रहाचे स्थान ‘गोल्डीलॉक्स’ भागात येत असल्यामुळे या ग्रहावर द्रवरुप पाणी आणि जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला बळकटी मिळते.
इतरही अनेक ग्रहांचा याच मंडळामध्ये शोध लागला असून मात्र ते जीवसृष्टीला पूरक नसल्याचेही राईट यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील संपूर्ण संशोधन The Astrophysical Journal Letters मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे एका वृत्त संस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.