हायवेची सुरक्षा हनुमानभरोसे

himachal
हिंदू संस्कृतीत महाबली हनुमान संकटमोचन म्हणजे संकटाचे निराकरण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तांचे रक्षण करणारा हनुमान वाहनांचेही रक्षण करतो असे सांगितले तर कदाचित खोटे वाटेल मात्र हिमाचल मधील लोकांची तशी श्रद्धा आहे व त्यामुळेच अतिखडतर असा पठाणकोट ते मंडी या १९७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुरक्षा हनुमानावर सोपविली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा रस्ता अपघातप्रवण क्षेत्र असून येथे आजपर्यंत हजारो लोकांचे जीव रस्ते अपघातात गेले आहेत. आपल्या आवडत्या व्यक्ती या रस्त्यावर अपघातात गमावण्याची वेळ आलेल्या लोकांनी तसेच स्थानिकांनीही पुढाकार घेऊन या रस्त्यावर जागोजाग हनुमान मंदिरे बांधली आहेत. जेथे साधारण अपघात होतात अशा ५० जागांवर अशी मंदिरे आहेत आणि असेही सांगितले जाते की येथे अपघातांचे प्रमाण त्यानंतर खूपच कमी झाले आहे.

वास्तविक जेथे रस्ते अवघड आणि अपघातप्रवण असतील तेथे सरकारतर्फे वाहने हळू चालवा, अपघातग्रस्त जागा असे बोर्ड लावले जातात. हिमाचल सरकारने हे काम केलेले नाही मात्र हे काम हनुमान मंदिरे उभारून लोकांनीच केले आहे. भाविकांनी या रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांची सुरक्षा पवनपुत्राकडे सोपविली आहे. या रस्त्याच्या सर्वात धोकादायक अशा त्रिलोकपूर कोटला भागात अशी किमान ३० मोठी मंदिरे आहेत तर लहान लहान मंदिरांची गणतीच नाही.

वाहनचालक त्यांचे अनुभव सांगताना म्हणतात हा श्रद्धा आणि सचेतनेचा चांगला नमुना आहे. मंदिर दिसले की चालकही आपोआपच नमस्कार करावा म्हणून वाहनाचा वेग कमी करतात आणि दुसरीकडे येथे मंदिर आहे म्हणजे पूर्वी अपघात झालाय याची जाणीव होते आणि आपोआपच वाहन नियंत्रणात ठेवले जाते. त्यामुळे या धोकादायक मार्गावरच्या वरील पट्टात गेल्या कांही वर्षात अपघात झालेला नाही. म्हणजे सरकारी पाट्या जे काम करू शकत नाहीत ते काम हनुमानजी अगदी सहज करून दाखवित आहेत.

Leave a Comment