‘पीजीडीएम’ अभ्यासक्रमांना न्यायालयाची मान्यता

PGDBM
पुणे: व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदविका (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांच्या मुदतवाढीस सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे; अशी माहिती ‘एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडिया’च्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

ईपीएसआय, असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) आणि जयपुरिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ‘एआयसीटीई’च्या सन २०१० च्या नोटिफिकेशनला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या नोटीफिकेशननुसार व्यवस्थापनशास्त्राचे सर्व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात तीन संस्थांनी एकत्रितपणे दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. वाय. इक्बाल आणि न्यायमूर्ती सी. नागप्पन यांनी सुनावणी केली.

सन २०११ मध्ये आलेल्या या नोटिफिकेशनच्या स्थगितीला पुनर्वाढ द्यावी, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यानुसार न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांचा मार्ग खुला केला.

Leave a Comment