आता मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांतून स्नॅपडीलची सेवा

snapdeal
नवी दिल्ली – ई-कॉमर्समधील अग्रगण्य स्नॅपडील ही कंपनी ऑनलाइन ग्राहकांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी मराठी व्यतिरिक्त अन्य ११ भाषांमध्ये सेवा देणार आहे. मंगळवारपासून कंपनीने हिंदी आणि तेलगू भाषेमध्ये सेवा सुरू केली आहे. भारतीय भाषांमध्ये सेवा देणारी स्नॅपडील आता देशातील पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे. आतापर्यंत ज्या ग्राहकांशी आपला संपर्क आला नाही, त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

इंग्रजी, हिंदी आणि तेलगू या व्यतिरिक्त मराठी, गुजराती, तामिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिशा, आसामी आणि पंजाबी या भाषांतून कंपनी २६ जानेवारीपासून सेवा देणार आहे. इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांचा वापर केल्यामुळे देशातील १३ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. भारतीय ग्राहक अजूनही आपल्या मातृभाषेला प्राथमिक स्थान देत असून आपल्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, असे स्नॅपडीलचे सहसंस्थापक रोहित बन्सल यांनी सांगितले.

कंपनीने ग्राहक आणि विक्रेत्यांकडून मिळालेल्या प्रतिसादातून प्रादेशिक भाषांमध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रयोगामुळे आपण आता लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून नव्या ग्राहकांमध्ये वाढ होणार आहे. कंपनीने भाषांतरासाठी नव्या आधुनिक पद्धतीच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. ग्राहकांना आपल्या आवडत्या भाषेची निवड करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment