भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत झिरो नोट लोकप्रिय

zero
चेन्नई – भ्रष्टाचाराविरोधात तमीळनाडूत ९ वर्षांपूर्वीच फिफ्थ पिलर (पाचवा स्तंभ) या संस्थेने सुरू केलेली मोहिम आता देशभरात लोकप्रिय होऊ लागली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामागे कारण आहे ती झिरो नोट. अशा २५ लाख नोटा या संस्थेने आत्तापर्यंत वाटल्या आहेत आणि त्यामुळे लाच मागणारे लाचखोरही धास्तावले आहेत असे समजते.

फिफथ पिलर ही संस्था भ्रष्टाचार विरोधात ठामपणे उभे राहणार्‍यांची इच्छा असलेल्या लोकांसाठी कार्यरत आहे. सरकारी कार्यालयात अथवा अन्य ठिकाणी कामे करून घेताना जर कुणी लाच मागत असेल तर झिरो नोट संबंधितांना द्यायची. नंतर भ्रष्टाचार निर्मूलन विभागाकडे तक्रार नोंदवून संबंधित लाचखोराविरोधात कारवाई करायची व लाच न देता काम करून घ्यायचे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. संस्थेची १२ जिल्ह्यात सेंटर्स आहेत.

संस्थेच्या लक्ष्मी गुजारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लाच मागितली गेली की ही नोट आम्ही देतो. या नोटा आम्हीच छापल्या आहेत आणि त्यावर रकमेच्या जागी झिरो व रिझर्व्ह बँक छापाच्या जागी भ्रष्टाचार संपवा असे छापले गेले आहे. लाच देणार नाही आणि घेणार नाही असा मेसेजही आहे व त्यावर संस्थेचा फोन नंबर व आयडी छापला गेला आहे. ही कल्पना विजय आनंद यांची आहे.

अनुभव असा की ही नोट पाहताच अनेकांची कामे लाच न देताही झाली आहेत. सुरवातीला लाचखोरांनी या नोटेची टिंगल केली मात्र आता त्यांना जरब बसली आहे. या नोटेबरोबरच ही संस्था सर्वसामान्यांना अन्य माहितीही पुरविते आणि त्यांच्या कामात सहाय्यही करते. विशेष म्हणजे संस्थेच्या साईटवरून ही झिरो नोट डाऊनलोड करून प्रिटही करता येते त्यामुळे देशभरात कुठेही ती उपलब्ध होऊ शकते आहे. या नोटेवरील मजकूर सध्या तमीळ, मल्याळम, तेलगू भाषेत आहे.