५० अब्ज डॉलर्सवर जाणार डबाबंद अन्नपदार्थांची उलाढाल

assochem
नवी दिल्ली : दिवसेंदिवस खाण्यासाठी लागणा-या तयार डबाबंद अन्नपदार्थांचा बाजार वाढत चालल्यामुळे २०१७ पर्यंत डबाबंद अन्नपदार्थांचा बाजार तब्बल ५० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता अ‍ॅसोचॅमने केलेल्या सर्वेक्षणात वर्तविली आहे. ३२ अब्ज डॉलर्सवर सध्या हा बाजार आहे.

खाण्या-पिण्याच्या सवयी महानगरात बदलल्या असून ७९ टक्के कुटुंबीय डबल उत्पन्न, बदलती जीवन शैली आणि बदललेल्या सुविधा यामुळे डबाबंद अन्नपदार्थाकडे ओढले गेले आहेत. या सर्वेक्षणात ७६ टक्के आई-वडील नोकरी करणारे असून, त्यांची मुले ५ वर्षांपेक्षी कमी वयाचे असल्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्याच असून, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महिन्यातून १० ते १२ वेळा तयार केलेले डबाबंद अन्न खावू घालतात.

अ‍ॅसोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी शहरी भागात विशेषतः महानगरांत डबाबंद अन्नपदार्थांची मागणी अधिक आहे. त्यामुळे याची उलाढाल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुळात सध्याचे युगच धावपळीचे आहे. महानगरांतील स्थिती तर त्यापेक्षा अधिक वेगवान बनली आहे. त्यामुळे डबाबंद अन्नपदार्थांची मागणी वाढली असून, यातील उलाढाल दिवसेंदिवस अधिक होत चालल्याने ब-याच कंपन्यादेखील डबाबंद अन्नपदार्थ तयार करण्याकडे ओढल्या जात आहेत. अ‍ॅसोचेमच्या अहवालानुसार महानगर आणि ग्रामीण भागातील जगण्यात जमीन-आसमानचा फरक असून, डबाबंद खाद्य पदार्थांतील शहरी क्षेत्रातील योगदान ८० टक्के आहे. भविष्यात याचे आकर्षण अधिक वाढणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत या क्षेत्रातील उलाढाल ५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, असे अ‍ॅसोचॅमचे म्हणणे आहे.

Leave a Comment