शिर्डी ट्रस्टला सरकारी सोने गुंतवणुकीत अडचण

shirdi
शिर्डी- पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या गोल्ड मोनेटायझिग फंडात सोने गुंतवणुकीसाठी तिरूपती बालाजी नंतर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने उत्सुकता दाखविली आहे त्याचप्रमाणे शिर्डीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टलाही या योजनेत ४०० किलो सोने गुंतवणूक करायची असून तसा निर्णयही घेतला गेला आहे. जगभरातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांचे शिर्डी श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानले जाते. मात्र ट्रस्टला ही गुंतवणूक करताना कायदेशीर अडचण आली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सरकार गोल्ड मोनेटायझिग स्कीमनुसार गुंतविलेल्या सोन्यावर दोन ते अडीच टक्के व्याज देणार आहे. तिरूपती बालाजी या योजनेत ५ टन सोने गुंतवणुकीचा विचार करत आहे तर सिद्धीविनायक ट्रस्टने ४० किलो सोने गुंतविले आहे. त्यावर त्यांना दरवर्षाला ६९ लाख रूपये व्याज मिळणार आहे. शिर्डी संस्थानने या योजनेत ४०० किलो म्हणजे ४ क्विंटल सोने गुंतवणुकीसाठी मान्यता दिली असून त्यापोटी ट्रस्टला वर्षाला सव्वा कोटी रूपये व्याज मिळेल. ट्रस्टचे सदस्य बाजीराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अडचण अशी आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डी संस्थानला भाविकांनी दान स्वरूपात दिलेले सोने वितळविता येत नाही. त्यामुळे गोल्ड फंडात सोने गुंतविण्यत अडचण आली आहे. त्यासाठी मुंबई न्यायालयाकडून मार्गदर्शन मागितले गेले आहे व त्यानंतर ही गुंतवणूक केली जाणार आहे.

Leave a Comment