घर घ्या विकत केवळ १ युरोमध्ये

house
स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घर घेणे इतके सोपे कुठे आहे? आपल्याकडे तर म्हण आहे की लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून. पैकी आज बँका घरांसाठी लोन देण्यास पुढे आल्याने अनेकांना आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लागत आहे. मात्र तरीही खूप मोठा समुदाय या स्वप्नापासून अजून दूर आहे. त्यांच्यासाठी ही खूषखबर. अर्थात त्यासाठी इटली गाठावी लागेल बर का!

इटलीतील सिसिली, गांगी, केटेगालिगर, पिडमॉन्ट-लेकेनी अशा अनेक शहरात फक्त १ युरो म्हणजे ७२ भारतीय रूपयांत घरे विक्रीसाठी आहेत मात्र तरीही तेथे ग्राहकांची वानवा आहे. त्याचे कारण असे की ही शहरे भूतबाधा असलेली व झपाटलेली आहेत असा लोकांचा समज आहे. येथे राहणार्‍यांना रोजगार मिळत नाही व या भागावर नैसर्गिक संकटेही वारंवार कोसळतात.अनेकदा येथील नागरिकांचे अपहरणही केले जाते. त्यामुळे घाबरून लोक येथे राहण्यास धजावत नाहीत. परिणामी आकर्षक ऑफरवर घरे विक्रीला उपलब्ध आहेत.

मेयर सांगतात येथे १ युरो मध्ये घर विक्रीला आहे हे सत्य असले तरी ही घरे दुरूस्त करायला हवीत व त्यासाठी १५ ते १८ लाख रूपये खर्च येऊ शकतो. म्हणजे नाल मिळाला म्हणून घोडा घेतला अशीच परिस्थिती आहे.